मुंबई

पालिकेची मराठी पाट्यांसाठी धडक मोहीम; तीन वर्षांत

मनोज कुळकर्णी

मुंबई :
मुंबई आणि महाराष्ट्रात नेहमीच मराठी भाषेवरून राजकारण होत आल्याच पाहायला मिळत त्यातच मुंबईत मराठी भाषेत बोलणे आस्थापनावरील मराठी सोडून इतर भाषेतील पाट्या यावरूनही मोठ राजकारण होते.

मुंबईतील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी नामफलक लावण्यासाठी महापालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाकडून सातत्याने मोहीम राबविण्यात येत आहे. नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२६ या कालावधीत महापालिकेने तब्बल २ लाख ६ हजार ८०१ आस्थापनांना भेटी देऊन मराठी नामफलकाची पाहणी केली. यापैकी २ लाख ३७९ आस्थापनांनी मराठी पाट्या लावल्याची नोंद झाली आहे.

मात्र, अद्यापही ६ हजार ४२२ आस्थापनांवर मराठी नामफलक नसल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळून आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर न्यायालयीन तसेच पालिका प्रशासनामार्फत कारवाई करण्यात आली असून, आतापर्यंत ३ कोटी १५ लाख ५२ हजार ७७५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

मराठी नामफलक लावण्यास टाळाटाळ करणाऱ्या आस्थापनांवर कारवाईची प्रक्रिया पुढेही सुरू आहे. ३ हजार ८८३ आस्थापनांविरोधात न्यायालयीन कारवाई सुरू असून, मराठी नामफलकासाठी १ हजार ६३३ आस्थापनांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यापैकी ९०६ अर्जांची प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.

दरम्यान, वसूल करण्यात आलेल्या दंडाच्या रकमेत विभागनिहाय मोठी तफावत दिसून येते. बी वॉर्डमध्ये सर्वाधिक ६० लाख ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्याखालोखाल के. पश्चिम विभागात १८ लाख ३९ हजार, के. पूर्व विभागात १४ लाख ५१ हजार २००, जी. दक्षिण विभागात ६ लाख १५ हजार ६०० आणि एफ. उत्तर विभागात ४० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मराठी नामफलकांच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेची तपासणी आणि कारवाईची मोहीम यापुढेही सुरू राहणार असून, नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक तसेच न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे.

Related Articles

Back to top button