सुधार समितीत जोगेश्वरीतील मैदानाच्या आरक्षणावरून भाजपचा ‘सभात्याग, ठाकरे गटाने उडवली खिल्ली

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीत मंगळवारी सत्ताधारी भाजप आणि शिंदे सेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. जोगेश्वरी येथील मोकळ्या मैदानाच्या जागेचे आरक्षण बदलण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षांमध्येच तीव्र मतभेद पाहायला मिळाले. शिंदे सेनेच्या अध्यक्षांनी भाजपचा विरोध डावलून हा वादग्रस्त प्रस्ताव मंजूर केल्यामुळे संतापलेल्या भाजपने बैठकीतून थेट वॉकआऊट केले. दरम्यान, प्रस्ताव आधी मंजूर होऊ द्यायचा आणि नंतर सभात्याग करून पळ काढायचा, असा टोला लगावत ठाकरे गटाने भाजप आणि शिंदे सेनेच्या या भूमिकेवर जोरदार तोफ डागली आहे.
जोगेश्वरी मजास येथे एका निवासी इमारतीच्या बाजूला महापालिकेची मोकळी जागा आहे. विकास आराखड्यानुसार या जागेचे मूळ आरक्षण बगीचा, खेळाचे मैदान आणि महापालिका शाळा असे निश्चित करण्यात आले होते. मात्र, हे मूळ आरक्षण रद्द करून संबंधित मोकळी जागा पुन्हा ‘म्हाडा’च्या ताब्यात देण्याचा नवा प्रस्ताव सुधार समितीसमोर मंजुरीसाठी आणण्यात आला. या आरक्षण बदलाला भाजपचा तीव्र आक्षेप होता. हा विषय समितीच्या पटलावर आणू नये, अशी स्पष्ट भूमिका भाजपने आधीच शिंदे सेनेकडे मांडली होती.
मात्र भाजपच्या या सूचनेला न जुमानता सुधार समितीच्या अध्यक्षा तथा शिंदे सेनेच्या नगरसेविका संध्या दोषी यांनी हा प्रस्ताव बैठकीत मांडला आणि बहुमताच्या जोरावर मंजूरही केला. मित्रपक्षानेच घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे संतप्त झालेल्या भाजप नगरसेवकांनी प्रस्ताव मंजूर होताच सुधार समितीच्या बैठकीतून तडकाफडकी वॉकआऊट केले. सत्तेत एकत्र असूनही मोकळ्या भूखंडांच्या आरक्षणावरून दोन्ही पक्षांमधील विसंवाद या घटनेमुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
तर सुधार समितीतील या घडामोडींवर ठाकरे गटाचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी सडकून टीका केली. सुधार समितीचे रूपांतर आता ‘आरक्षण बदला समिती’मध्ये झाले असल्याचा घणाघात करत पडवळ म्हणाले की, मुंबईतील मैदाने, उद्याने आणि मोकळ्या जागांची मूळ आरक्षणे तशीच सुरक्षित राहावीत यासाठी आम्ही गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने आवाज उठवत आहोत. मात्र सत्ताधारी मोकळ्या जमिनी परस्पर बिल्डरांच्या आणि संस्थांच्या घशात घालण्याचा सपाटा लावत आहेत.
भाजपच्या वॉकआऊटवर निशाणा साधताना पडवळ पुढे म्हणाले की, हा केवळ मुंबईकरांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा आणि विरोध दाखवण्याचा देखावा आहे. भाजपचा जर खरोखरच या आरक्षणाला विरोध होता, तर त्यांनी प्रस्ताव ‘नॉट टेकन’ करण्याची आग्रही भूमिका का घेतली नाही? शिंदे सेनेने प्रस्ताव रेटून मंजूर केला आणि तो मंजूर झाल्यावर भाजपने नाटक करत सभात्याग केला. जर त्यांच्यात एवढीच प्रामाणिक भूमिका असेल, तर आज जसा सुधार समितीत वॉकआऊटचा फार्स केला, तसाच हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जेव्हा महापालिकेच्या पूर्ण सभागृहात येईल, तेव्हाही भाजपने असाच वॉकआऊट करून दाखवावा, असे खुले आव्हान पडवळ यांनी दिले. या वादामुळे मुंबईतील मोकळ्या भूखंडांच्या आरक्षणाचा मुद्दा आगामी काळात अधिक तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



