मुंबई

आदित्य ठाकरेंच्या टीकेला भाजपचा पलटवार; ‘आधी आपल्या पक्षाची ताकद समजून घ्या’

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील १४ फुटांवरील अनधिकृत बांधकामांच्या प्रस्तावावरून शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी ‘एक्स’वरून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत, सरकार चालवण्याबाबत सल्ला देण्यापूर्वी उबाठा गटाची राजकीय ताकद तपासण्याचा टोला लगावला.

“आधी आपल्या उबाठा गटाची आणि भाजपची ताकद समजून घ्या, मग सरकार चालवण्याचे सल्ले द्या. आज भाजपची देशातील २१ राज्यांमध्ये सत्ता आहे आणि तुमच्या पक्षाकडे तेवढे आमदारही उरलेले नाहीत,” असे बन यांनी म्हटले आहे. जनतेने भाजपला सत्ता दिली असताना सरकार चालवता येत नाही, असा आरोप करण्यापूर्वी आपल्या पक्षाची संख्या एवढी कमी का झाली, याचे आत्मपरीक्षण करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारवर ‘बिल्डरधार्जिण्या धोरणा’चा आरोप करण्यापूर्वी त्यांच्या सरकारच्या काळातील मुंबईतील पुनर्विकास, झोपडपट्टी पुनर्वसन आणि बांधकाम धोरणाचा हिशोब मुंबईकरांसमोर मांडावा, अशी मागणीही बन यांनी केली.

दरम्यान, वरळीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित करत भाजपने उबाठावर टीका केली. “देवाभाऊंच्या नेतृत्वाखालील सरकारने वरळीतील बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काची घरे दिली,” असा दावा बन यांनी केला. त्याचवेळी उबाठाच्या कार्यकाळावर टीका करताना त्यांनी पत्राचाळ प्रकरणाचा उल्लेख केला. “तुमचा इतिहास मात्र मराठी माणसाला लुटून पत्राचाळ घोटाळा करण्याचा आहे,” असा आरोप त्यांनी केला.

आदित्य ठाकरे यांच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर भाजपने केलेल्या या पलटवारामुळे मुंबईतील पुनर्विकास आणि अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

Related Articles

Back to top button