मुंबई

Mumbai – waterway service launched;मुंबईकरांसाठी जलप्रवासाचा मार्ग मोकळा; भाऊचा धक्का-रेवस बोट सेवा पूर्ववत

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतून रेवस जलमार्ग बंद करण्यात येत असतो.पावसाळ्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेली भाऊचा धक्का ते रेवसदरम्यानची प्रवासी बोट सेवा गुरुवारपासून पुन्हा सुरू करण्यात आली. सागरी वाहतुकीसाठी वातावरण अनुकूल झाल्याने ही सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईहून रेवस, अलिबाग तसेच पुढील कोकण भागात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच करंजा-रेवस जलमार्गावरील प्रवाशांचा ताण कमी होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी पावसाळ्यात सुरक्षिततेच्या कारणास्तव भाऊचा धक्का-रेवससह काही सागरी मार्गांवरील प्रवासी वाहतूक बंद ठेवली जाते. यंदा २६ मेपासून भाऊचा धक्का-रेवस मार्गावरील सेवा बंद होती. सप्टेंबरपासून मोरा-भाऊचा धक्का आणि गेटवे-मांडवा या मार्गांवरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली होती. मात्र, बदलत्या हवामानामुळे भाऊचा धक्का-रेवस मार्गावरील सेवा सुरू करण्यात आलेली नव्हती.
आता सागरी वाहतुकीसाठी परिस्थिती अनुकूल झाल्याने चार महिन्यांपासून बंद असलेली ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईहून रेवस आणि अलिबागकडे जाणाऱ्या प्रवाशांना रस्ते वाहतुकीला जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

दिवसभरात सहा फेऱ्या

भाऊचा धक्का येथून सकाळी ६.३० वाजता रेवससाठी पहिली बोट रवाना होणार आहे. त्यानंतर सकाळी ८, १० आणि दुपारी १२ वाजता, तसेच दुपारी ४ आणि ५ वाजता बोटी सोडण्यात येतील. मुंबई-रेवस मार्गावरील प्रवासाचे तिकीट १०० रुपये आहे.

दरम्यान, सागरी हवामानात बदल झाल्यास किंवा खराब हवामान निर्माण झाल्यास बोटीच्या वेळापत्रकात बदल केला जाऊ शकतो, अशी माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेकडून देण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button