बेस्ट समितीत भाजप-शिंदे सेनेत खडाजंगी

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) – बेस्टच्या अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावरून बेस्ट समितीच्या बैठकीत भाजप आणि शिंदे सेनेच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. भाजपचे सुनील गणाचार्य आणि बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांच्यात अर्थसंकल्पातील खर्च, लेखापरीक्षण तसेच प्रस्ताव मंजूर करण्याच्या पद्धतीवरून तीव्र शाब्दिक वाद झाला.
बैठकीदरम्यान गणाचार्य यांनी समितीच्या कामकाजावर आणि अर्थसंकल्पाशी संबंधित प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी अध्यक्षांना उद्देशून, “तुम्हाला विषयाचं गांभीर्य नाही,” अशा शब्दांत थेट नाराजी व्यक्त केली. त्यामुळे बैठकीतील वातावरण काही काळ चांगलेच तापले.
अर्थसंकल्पातील विविध खर्चाच्या तरतुदी, त्यांचे लेखापरीक्षण आणि प्रस्ताव मंजुरीची प्रक्रिया याबाबत गणाचार्य यांनी आक्षेप नोंदवत समितीच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला. त्यावर समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनीही गणाचार्य यांच्या आक्षेपांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
दोन्ही बाजूंनी भूमिका मांडताना काही काळ बैठकीत तू-तू, मैं-मैंचे वातावरण निर्माण झाले. प्रस्ताव मंजूर करण्याच्या प्रक्रियेवरूनही दोघांमध्ये मतभेद असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. अखेर संबंधित प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे अध्यक्षा विश्वासराव यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यानंतरही बैठकीतील तणावपूर्ण वातावरण काही काळ कायम राहिले.
बेस्टच्या आर्थिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय निर्णय आणि समितीच्या कामकाजाच्या पद्धतीवरून सत्ताधारी गटातीलच सदस्यांमध्ये झालेल्या या वादाची बेस्ट वर्तुळात चर्चा सुरू आहे.



