मुंबई

बस भाडेवाढीचा ‘बेस्ट’ला फायदा; वर्षभरात उत्पन्नात तब्बल ४९७ कोटींची वाढ!

मुंबई : बेस्टच्या बस भाड्यात ९ मे २०२५ पासून करण्यात आलेल्या वाढीचा परिवहन विभागाच्या महसुलावर परिणाम झाल्याचे २०२५-२६च्या आर्थिक तपशिलातून दिसून येत आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत बेस्टच्या बस विभागाच्या उत्पन्नात तब्बल ४९७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. २०२४-२५ मध्ये १,६४० कोटी रुपये असलेले उत्पन्न २०२५-२६ मध्ये २,१३७ कोटी रुपयांवर पोहोचले.

विशेष म्हणजे, उत्पन्नात मोठी वाढ झालेली असताना बस विभागाच्या खर्चात वाढ झालेली नाही. उलट, २०२४-२५ मधील सुमारे ३,३६३ कोटी रुपयांचा खर्च २०२५-२६ मध्ये सुमारे ३,३२० कोटी रुपयांवर आला आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीसोबत खर्चात झालेली घट बेस्टच्या परिवहन विभागासाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची ठरली आहे.

उत्पन्नवाढीत तिकीट विक्रीचा मोठा वाटा आहे. भाडेतत्त्वावरील बसगाड्यांच्या तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात २३५.३० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, स्वमालकीच्या बसगाड्यांच्या तिकीट विक्रीच्या उत्पन्नात सुमारे सहा कोटी रुपयांची घट झाली. मासिक बसपास, आरक्षित बसगाड्या आणि अन्य उत्पन्नातूनही वाढ झाली आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेकडून बेस्टला मिळणाऱ्या अनुदानातही वाढ झाली आहे. २०२४-२५ मध्ये सुमारे ७९४.४२ कोटी रुपये अनुदान मिळाले होते. २०२५-२६ मध्ये हे अनुदान वाढून एक हजार कोटी रुपयांवर पोहोचले.

बेस्ट बस विभागाची आर्थिक स्थिती

आर्थिक वर्षउत्पन्नखर्च
२०२४-२५₹१,६४० कोटी₹३,३६३ कोटी
२०२५-२६₹२,१३७ कोटी₹३,३२० कोटी

ठळक मुद्दे :

  • बस विभागाच्या उत्पन्नात ४९७ कोटींची वाढ
  • भाडेतत्त्वावरील बसच्या तिकीट विक्रीत २३५.३० कोटींची वाढ
  • बस भाडेवाढ ९ मे २०२५पासून लागू
  • बस विभागाच्या खर्चात ४३ कोटींची घट
  • महापालिका अनुदान ७९४.४२ कोटींवरून १,००० कोटी

Related Articles

Back to top button