मुंबई

मेट्रोच्या खांबाला धडकून बसचा अपघात; मानखुर्द पुलावरील घटना, प्रवासी जखमी

​मुंबई: ऐरोली येथून प्रतीक्षा नगर आगाराकडे जाणाऱ्या ‘बेस्ट’ कंत्राटी बसचा मानखुर्द स्टेशन पुलावर भीषण अपघात झाला. रस्त्यावर अचानक आलेल्या पादचाऱ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे बस मेट्रोच्या खांबाला जाऊन धडकली. आज शुक्रवारी पहाटे २:१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात एक प्रवासी जखमी झाला आहे.

​माहितीनुसार, मातेश्वरी-प्रतीक्षा नगर डेपोची बस (मार्ग क्र. ५०१/४१, क्र. एमएच-०१-ईएम-२७६७) ऐरोलीवरून प्रतीक्षा नगरकडे जात होती. मानखुर्द स्टेशन पुलावर आले असताना डाव्या बाजूने चार पादचारी अचानक रस्ता ओलांडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी चालकाने तातडीने आपत्कालीन ब्रेक मारला. यात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस मानखुर्द मेट्रो स्टेशनच्या खांबाला धडकली.

​या अपघातात बसमधील एका अज्ञात प्रवाशाच्या डाव्या मनगटाला आणि मांडीला दुखापत झाली. जखमी प्रवाशाने तातडीने आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधून उपचारासाठी सायन रुग्णालय गाठले.
​
अपघाताची माहिती मिळताच बस चालक व वाहकाने मानखुर्द पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक गिरीश साठे यांनी चालक व वाहकाचा जवाब नोंदवून घेतला आहे. जखमी प्रवासी पोलीस ठाण्यात आल्यानंतर पुढील गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

​तसेच, अपघातग्रस्त बस टोईंग वाहनाच्या साहाय्याने पहाटे ५:३० वाजता प्रतीक्षा नगर डेपोत आणण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Back to top button