मुंबई

गर्जना मोर्चा नव्हे, ही तर ‘कोल्हेकुई’: आशिष शेलारांचा विरोधकांवर हल्लाबोल

ईव्हीएम, निवडणूक आयोग आणि एसआयआरच्या मुद्द्यावरून टोला

मुंबई : निवडणुकीत विजय मिळाला की ईव्हीएम आणि निवडणूक आयोग योग्य, मात्र पराभव झाला की त्याच ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर आरोप करायचे, ही विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे. आजचा मोर्चा ‘गर्जना मोर्चा’ नसून ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ या म्हणीला साजेसा ‘कोल्हेकुई मोर्चा’ होता, अशी टीका सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली.

विरोधी पक्षांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शेलार यांनी ईव्हीएम, निवडणूक आयोग आणि एसआयआरच्या मुद्द्यावरून विरोधकांवर निशाणा साधला. जागतिक प्राणी दिनाचा संदर्भ देत ते म्हणाले, “आजचा मोर्चा पाहिल्यानंतर त्याचे नाव ‘गर्जना मोर्चा’ नव्हे, तर ‘कोल्हेकुईचा मोर्चा’ असायला हवे होते.”

ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्त झाल्यानंतर झालेल्या सहा निवडणुकांचा संदर्भ देत शेलार म्हणाले की, यापैकी काही ठिकाणी भाजप किंवा एनडीएला यश मिळाले, तर केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये गैरभाजप पक्ष सत्तेवर आले. त्यामुळे निवडणूक आयोग पक्षपाती असल्याचा विरोधकांचा आरोप तथ्यहीन आहे. निवडणुकीतील पराभवाचे खापर आयोगावर फोडण्याऐवजी जनतेचा कौल स्वीकारण्याची गरज आहे, असे त्यांनी सुनावले.

‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्टं’

“आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं,” अशी विरोधकांची मानसिकता झाली आहे. हा वैचारिक गोंधळ आहे, असा टोला शेलार यांनी लगावला. महाराष्ट्रात विधानसभा फेरनिवडणूक घेण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती होण्यापूर्वीच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाल्याचे माहीत नाही का, असा सवालही त्यांनी केला.

ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनाही शेलार यांनी लक्ष्य केले. २००७, २०१२ आणि २०१७च्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर झाला आणि त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला यश मिळाले. मग स्वतःचा विजय ईव्हीएमवर झाला तेव्हा ते योग्य आणि इतरांचा विजय झाला की ईव्हीएममध्ये घोटाळा, अशी भूमिका कशी घेता, असा सवाल त्यांनी केला.

२००९ मध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाचे सर्वाधिक आमदारही ईव्हीएमच्या माध्यमातूनच निवडून आले होते, याची आठवण शेलार यांनी करून दिली. काँग्रेसनेच ईव्हीएम आणण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसच्या काळात ईव्हीएमवर झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस विजयी झाली तेव्हा ईव्हीएम योग्य होते; मात्र आज भाजप विजयी होत असताना ईव्हीएम नको, अशी भूमिका जनतेला मान्य होणार नाही, असे ते म्हणाले.

एसआयआरमुळे मतदार यादी अधिक सुरक्षित

एसआयआरच्या माध्यमातून मतदार यादी अधिक शुद्ध आणि सुरक्षित होणार असून, सुमारे ९० टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित मतदारांचीही पडताळणी केली जात आहे. त्यामुळे एसआयआरबाबत जनतेमध्ये गैरसमज निर्माण करू नयेत, असे आवाहन शेलार यांनी केले.

राज ठाकरे यांनी यापूर्वी मतदार यादीतील विसंगती आणि कथित दुबार मतदारांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी मतदारांच्या वयाच्या नोंदीतील विसंगतींबाबत, तर १९ ऑक्टोबर २०२५ रोजी कथित ९६ लाख बोगस मतदारांबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. मतदार याद्या स्वच्छ करण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर आता आयोगाकडून मतदार याद्यांची पडताळणी आणि शुद्धीकरण केले जात असताना त्याला विरोध का, असा सवाल शेलार यांनी केला.

मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे. जनतेने दिलेला कौल स्वीकारण्याऐवजी पराभवानंतर विरोधक रडगाणे गात आहेत. त्यामुळे हा ‘गर्जना मोर्चा’ नसून ‘रडक्यांचा मोर्चा’ असल्याची बोचरी टीकाही शेलार यांनी केली.

निवडणूक आयोग, ईव्हीएम आणि एसआयआरविरोधातील मोर्चातील मागण्या व आरोपांमध्ये तथ्याचा अभाव आहे. त्यामुळे ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ या म्हणीपेक्षा या मोर्चाचे वर्णन वेगळे करता येणार नाही, असा टोला शेलार यांनी लगावला.

Related Articles

Back to top button