ॲपआधारित टॅक्सी चालकांची माहिती तीन महिन्यांत द्या: परिवहन विभागाचे कंपन्यांना निर्देश

मुंबई: ‘महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण २०२६’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ॲपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या चालकांची संपूर्ण माहिती तीन महिन्यांत परिवहन विभागाकडे सादर करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी दिले.
मंत्रालयात झालेल्या ‘महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण २०२६’च्या आढावा बैठकीत ते बोलत होते. चालकांची ओळख, वास्तव्य आणि आवश्यक कागदपत्रांची काटेकोर पडताळणी करण्यात येणार आहे. पात्र चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व देण्यात येणार आहे.
चालकांचे डोमिसाइल प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे कंपन्यांनी परिवहन विभागाकडे सादर करावीत. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चालकांची पार्श्वभूमी आणि वास्तव्याची खात्री करणे आवश्यक असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
ॲपआधारित टॅक्सी चालक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. चालकांना व्यवहारिक मराठी भाषा अवगत असणे अनिवार्य करण्यात येणार असून, पात्र चालकांना परिवहन विभागाकडून बॅज देण्यात येणार आहे.
अपघात तसेच गुन्हेगारीच्या घटना टाळण्यासाठी चालकांचे अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणे करावी. चालकांना सुविधा देतानाच प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही सरनाईक यांनी सांगितले.
बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच भारत टॅक्सी, रॅपिडो, उबर, ओला, शालिनी कॅब आणि सिटीफ्लो या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.



