मुंबई

सर्वाधिक ट्रोल होणाऱ्या मंत्र्याच्या पत्नीचा किताब मला मिळाला’; अमृता फडणवीसांनी नेमकं काय म्हटलं?

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आपल्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. नागपुरातील दहीहंडी कार्यक्रमानंतर त्यांनी गरबा, धार्मिक सणांमध्ये प्रवेश, संजय राऊत यांची टीका तसेच ‘लव्ह जिहाद’ यांसारख्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

गरबा आणि नवरात्रोत्सवात कोणाला प्रवेश द्यावा, यावरून गेल्या काही दिवसांत राजकीय आणि सामाजिक चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी हिंदू सणांमध्ये इतर धर्मीयांनाही सहभागी करून घेण्याची भूमिका मांडली. श्रद्धेने आणि कुटुंबासोबत सण साजरा करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीमुळे कोणताही त्रास होत नसेल, तर त्यांना सहभागी होण्याची संधी दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

आपल्या वक्तव्यांवर होणाऱ्या टीकेलाही अमृता फडणवीस यांनी उत्तर दिले. ‘सर्वाधिक ट्रोल होणाऱ्या मंत्र्याच्या पत्नीचा किताब’ आपल्याला मिळाल्याचे त्या म्हणाल्या. धार्मिक सणांमध्ये सर्वांना सहभागी करून घेण्याची परंपरा वाढली पाहिजे, असे सांगताना त्यांनी ख्रिसमस आणि न्यू इयरसारख्या सणांचा दाखला दिला.

हिंदू धर्मामध्येही विविध रंग आणि परंपरा असल्याचे सांगत त्यांनी दहीहंडी, नवरात्र आणि गरबा हे आनंदाचे सण असल्याचे नमूद केले. श्रद्धेने सहभागी होणाऱ्या आणि कोणत्याही प्रकारचा त्रास निर्माण न करणाऱ्या व्यक्तीला केवळ जात किंवा धर्माच्या आधारावर रोखणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे होते.

‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावरही अमृता फडणवीस यांनी भाष्य केले. काही लोकांनी काही कारणांमुळे अशी भूमिका घेतली असावी, त्यामागे लव्ह जिहादसारखी कारणे असू शकतात, असे त्या म्हणाल्या. अशा घटना रोखण्यासाठी भविष्यात कायदे अधिक कठोर करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, केवळ कायदे कठोर करून हा प्रश्न सुटणार नाही, तर मुलांना आपल्या धर्माची आणि संस्कृतीची माहिती देणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. मुलींना वेद, पुराणे आणि महाभारत यांची माहिती आहे का, त्यांचा आपल्या धर्मावर विश्वास आणि आपल्या धर्माबद्दल अभिमान आहे का, याचा विचार करण्याची गरज असल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या. मुलींना आपल्या धर्माची पुरेशी माहिती आणि त्याचा अभिमान असेल, तर अशा घटना कमी होतील आणि भविष्यात त्या पूर्णपणे थांबू शकतील, असा दावा अमृता फडणवीस यांनी ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावर केला.

Related Articles

Back to top button