भारतीय भाषांच्या मार्गातील अडथळे दूर करतील’अमित शाह

मुंबई: हिंदी दिवस आणि सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे आयोजन देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत होत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज येथे संबोधित केले. यावेळी त्यांनी देशभरातील राजभाषा प्रेमींना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आजपासून गणेशोत्सव सुरू होत असल्याने आणि गणपती बाप्पाचे आगमन झाले असल्याने हा मणीकंचन योग असल्याचे सांगत शाह म्हणाले, “मी मानतो की, विघ्नहर्ता भारतीय भाषांच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करतील. भारतीय भाषांच्या मार्गात जी विघ्ने आहेत, ती गणेश दूर करतील.”
शाह म्हणाले, “महाराष्ट्रात गणेशोत्सवाची सुरुवात १८९३ साली लोकमान्य टिळकांनी केली. टिळकांनी या देशाची नस पकडली. देशाची रचना, संस्कृती आणि इतिहास यात जागृती सांस्कृतिक राष्ट्रवादाने आणली जाऊ शकते. लोकमान्य टिळकांनी दोन गोष्टी सुरू केल्या. एक म्हणजे गणेशोत्सव आणि दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. या दोन उत्सवांच्या माध्यमातून देशभक्तीचा ज्वर उभा करण्याचे काम टिळकांनी केले. आज इथे गणेशोत्सवाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळकांना मनापासून प्रणाम करतो.”
आज येथे हिंदी भाषा संसाधन आणि हिंदी टंकन अंशलिपी यांच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ झाला असल्याचे सांगत शाह यांनी राजभाषा किर्ती सन्मान आणि राजभाषा गौरव पुरस्कार मिळालेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
शाह म्हणाले, “नरेंद्र मोदी असे पंतप्रधान मिळाले, ज्यांनी ‘वंदे मातरम्’ला पूर्ण स्वरूपाचा गौरव मिळवून दिला. हे गीत घनघोर गुलामीच्या कालखंडातील भारतीय चेतना जागृत करण्याचा प्रयत्न आहे. या कवितेने भारतीयांची चेतना जागृत केली. हे गीत संपूर्ण भारतात स्वातंत्र्याची उद्घोषणा बनले. ‘वंदे मातरम्’ने स्वातंत्र्य प्राप्त करण्याची तीव्र भावना जागृत केली. या गीताचे तुकडे केले गेले होते. हे गीत पूर्ण स्वरूपात स्वीकारण्यासाठी देशाच्या संसदेला ८० वर्षे लागली. नरेंद्र मोदींनी त्याला पूर्ण स्वरूपाचा गौरव मिळवून दिला. ही महान परंपरेची, विशाल विचारांची भूमी आहे.”
महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असल्याचे सांगत शाह म्हणाले, “त्यांनी स्वराज्याची कल्पना केली आणि ती सुस्पष्ट केली. स्वराज्य हे केवळ शासनापुरते मर्यादित नाही. स्वधर्म, स्वभाषा या तिघांना स्वराज्याचे मुख्य अंग बनवले. शासनात मराठीला महत्त्व दिले आणि भाषेचा राजकोष बनवला.”
“महाराष्ट्राच्या बहुभाषी संस्कृतीला मी प्रणाम करतो. मराठीचा सन्मान झाला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यासोबतच महाराष्ट्राच्या भूमीत कोकणी, गुजराती, हिंदी, सिंधी, वारली या अनेक भाषांचा एकत्र विकास झाला, सन्मान झाला आणि त्या स्वीकारल्याही. महाराष्ट्र या बहुभाषी प्रदेशाइतका एकही प्रदेश या देशात नाही,” असे शाह यांनी सांगितले.



