गृहमंत्री म्हणून नव्हे, आंदोलक म्हणून आलो’: अमित शहां

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी मुंबईतील फोर्ट येथील एशियाटिक सोसायटीला भेट देत पदाधिकारी आणि सदस्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. एशियाटिक सोसायटीच्या कार्यक्रमात अमित शहा यांनी भारतीय ज्ञान परंपरा, इतिहास, संस्कार, भाषा आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित केले.
भाषणाच्या सुरुवातीलाच “मी गृहमंत्री म्हणून नव्हे, तर आंदोलक म्हणून आलो आहे,” असे सांगत शहा म्हणाले, “एशियाटिक सोसायटीच्या इमारतीत प्रवेश करताना विनय सहस्रबुद्धे यांनी या इमारतीत पहिल्यांदाच देशाचे गृहमंत्री येत असल्याचे सांगितले. मात्र, मी गृहमंत्र्यांच्या नात्याने येथे आलो नाही. भारतीय ज्ञान परंपरा पुढील एक हजार वर्षे पुढे नेण्यासाठी आंदोलक म्हणून आलो आहे.”
विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीतील अनेक सदस्यांना आपण ओळखत असल्याचे सांगून शहा यांनी आगामी काळात एशियाटिक सोसायटी भारतीय ज्ञान परंपरेची वाहक बनेल, असा विश्वास व्यक्त केला.

‘ज्ञान जाळता येत नाही’
“नालंदाचे ग्रंथालय जाळण्यात आले. त्यावेळी महिनाभर धूर निघत होता. नालंदा जाळू शकतात; मात्र लोकांचे ज्ञान जाळू शकत नाही,” असे सांगत शहा यांनी ज्ञानाच्या सामर्थ्यावर भाष्य केले.
“आपला पराभव होतो, त्यावेळी पुढे जाण्याचा मार्ग शोधतो. विजय मिळाल्यानंतर ज्यांच्यावर विजय मिळवला, त्यांच्या स्मृती नष्ट न करता त्यांना आपल्या कार्यात जोडण्याचा प्रयत्न करतो,” असेही त्यांनी नमूद केले.
‘ज्ञानाला विचारधारेची बंधने नकोत’
“खऱ्या ज्ञानाला कोणतीही विचारधारा बंदिस्त करू शकत नाही. तुमची एखादी विचारधारा असेल, तर ज्ञानाच्या मार्गाने तुम्ही बदलू शकता. ज्ञान मुक्त असायला हवे,” असे शहा म्हणाले.
एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली, कधी केली आणि कोणत्या उद्देशाने केली, यापेक्षा तेथे उपलब्ध असलेल्या ज्ञानाच्या भांडाराचा उपयोग भारताला महान बनवण्यासाठी कसा करता येईल, याचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
‘भारतीय ज्ञान परंपरेचा उद्देश विश्वकल्याण’
भारतीय ज्ञान परंपरेचा उद्देश विश्वकल्याणाचा असल्याचे प्रतिपादन शहा यांनी केले. “भारतीय ज्ञान परंपरेचा उद्देश विश्वकल्याणाचा आहे. मात्र, ज्यांनी ही परंपरा आणि ज्ञानसंपदा निर्माण केली, त्यांचा उद्देश अनेक वर्षे लोकांवर शासन करण्याचा होता,” असे ते म्हणाले.
जो देश आपल्या इतिहास, संस्कार, भाषा आणि परंपरेचे रक्षण करत नाही, तो कितीही शक्तिशाली असला तरी नाहीसा होण्यासाठी उशीर लागत नाही. मात्र, जो राष्ट्र आपल्या स्मृती, इतिहास, संस्कार, भाषा आणि व्याकरणाचे संरक्षण करतो, त्या राष्ट्राला कितीही वर्षे गुलाम ठेवले तरी कायम गुलाम बनवता येत नाही, असेही शहा यांनी स्पष्ट केले.



