वांद्र्यात कलानगर येथे अजगर,अजगराच्या विळख्यात मांजर.
मनोज कुळकर्णी
मुंबई: मुंबईतल्या वांद्रे परिसरातील कलानगर येथील स्लॅम भागात आज सकाळी ११ फूट लांबीचा अजगर एका घराजवळ स्थानिक रहिवाश्यांना आढळून आला.त्या अजगराच्या विळख्यात मांजर होती.स्थानिकांनी सर्पमित्र अतुल कांबळे यांना फोन केला,वन विभागाला माहिती देत सर्पमित्रांनी अजगराची सुरक्षित सुटका केली पण मांजरीचा मात्र आधीच मृत्यू झाला होता.
आज दिनांक १८/०९/२०२६ रोजी सकाळी८:३८ला प्राणी प्रेमी असलेली संस्था ‘ वापरा’ संस्थेचे सर्पमित्र अतुल कांबळे यांना एका स्थानिक रहिवाशाचा फोन आला.त्यात त्यांच्या घराजवळ एका अजगर सापाने मांजरीला वेटोळे घालून पकडले असून मांजर जीवाच्या आतंकाने ओरडत आहे.तिचा श्वास कोंडलेला दिसत आहे. ती व्यक्ती घाबरलेल्या अवस्थेत रडत-रडत, “आपण लवकर या,” अशी विनंती अतुल कांबळे यांना करीत होती.
सदरची माहिती मिळताच वापरा संस्थेचे सर्पमित्र अतुल कांबळे यांनी सदर हद्दीतील वन विभागाचे राऊंड ऑफिसर दीपक गायकवाड तसेच ठाणे-मुंबई रेंज कंट्रोल ऑफिस यांना घटनेची माहिती दिली आणि अजगर सापाचे सुरक्षित रेस्क्यू करण्यासाठी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.
त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पाहणी केली असता, अजगर ने मांजरीला विळखा घातला होता त्यात तिचं जीव घुसमटून मृत्यू झालेला आढळून आला.
अजगर साप घराजवळच असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्याला कोणतीही इजा न करता सुरक्षित पद्धतीने रेस्क्यू करण्यात आले.अतुल कांबळे यांनी उपस्थित रहिवाशांना अजगर सापाबाबत आवश्यक माहिती देण्यात आली. तसेच घराच्या परिसरात साप लपण्यास किंवा येण्यास कारणीभूत ठरू शकणाऱ्या अडचणी व वस्तू दूर ठेवण्यास सांगण्यात आले.ह्या अजगराची लांबी अंदाजे ११ फूट असून, वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व नियमांचे पालन करून त्याला त्याच्या मूळ नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात येणार आहे अशी माहिती अतुल कांबळे यांनी दिली.



