मुंबई

Drought Relief: दुष्काळ जाहीर झाला, आता शेतकऱ्यांच्या हातात मदत कधी? आदित्य ठाकरे

मुंबई : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारच्या दुष्काळ घोषणेवरून सवाल उपस्थित केला. दुष्काळ जाहीर करा, ही सर्वांची मागणी होती. कर्नाटक सरकारनेही दुष्काळ जाहीर केला होता. आमचा दुष्काळग्रस्त दौरा सुरू असतानाच काल राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मात्र दुष्काळ जाहीर झाला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात मदत पोहोचणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दुष्काळ जाहीर करण्यास उशीर झाला असेल तर नियम आणि ‘ट्रिगर’ची अट बाजूला ठेवून शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

मागच्या वेळेस अतिवृष्टीसाठी ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते. मात्र, ते पॅकेज कोणाच्याही हातात आले नाही असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. त्यामुळे यावेळी केवळ दुष्काळ जाहीर करून चालणार नाही तर शासनाने प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान मराठवाड्यात ६५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा मुद्दाही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. शेतकरी संकटाची तीव्रता लक्षात घेऊन सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली.

Related Articles

Back to top button