उद्यापासून मुंबईसह राज्यात पावसाच कमबॅक, हवामान खात्याने वर्तवला अंदाज

मुंबई: यावर्षी अलनिनो मुळे राज्यात पावसाचे प्रमाण कमी आले चार महिने असलेल्या पावसाचे सव्वातीन महिने निघून गेले. उर्वरित तीन आठवड्यात पाऊस आपली उणीव भरून काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणि जनता चिंतेत आहे.मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची परिस्थिती सोडली तर राज्यात इतर धरणातील पाणी साठा जेमतेम आहे.शेतकरी चिंतेच्या गर्तेत सापडले आहेत. पावसाची मोठी तूट जाणवत आहे. गेल्या काही दिवसात पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यातील हवामान विभागाकडून पुढील 2 दिवसात राज्यातील हवामानात बदल होऊन अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
मुंबईसह राज्यातली आजची परिस्थिती
मुंबईत ऊन सावलीचा खेळ सुरू असून मधे कुठेतरी पाऊसाची सर येऊन जाते.त्यानंतर पुन्हा कडक उन्हाचा तडाखा बसतो.
कोकण विभागात आज कोणताही अलर्ट नाही. गेल्या काही दिवसांपासून या भागात पावसानं दडी मारली आहे. या भागात हवामान कोरडं आणि उष्ण आहे. मात्र, 12 सप्टेंबरनंतर कोकणातील हवामानात बदल होऊन पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पश्चिम महाराष्ट्रही कोरडा असून उष्ण हवामान आहे.पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी आज पाऊस पडण्याची शक्यता नाही.मात्र. काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता. तर पश्चिम महाराष्ट्रात दरवर्षीपेक्षा चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी आणि जनात यांची चिंता वाढली आहे. मात्र, पुढील दोन दिवसांनंतर काही भागांमध्ये पावसाच्या सरी वाढण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांतील काही भागात मध्यम पावसाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा भागांसाठी उद्या येलो अलर्ट देण्यात आल्यानं पावसाची शक्यता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मात्र, मागील अनेक दिवसांपासून पावसानं उघडीप घेतल्यानं या भागातही पावसाची मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. नाशिकच्या इगतपुरी भागात पाऊस पडल्यास मुंबईकरांची तहान वर्षभरासाठी भागवल्या जाऊ शकते कारण त्याच विभागात मुंबईला पाणी पुरवठा करणारे धरणांचे क्षेत्र आहे.
विदर्भात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडं आहे. काही भागांत उष्ण आणि ढगाळ वातावरण आहे. उद्यापासून हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया अमरावती,अकोला बुलढाना वाशिम परिसरात उद्यापासून पुढचे दोन तीन दिवस हलक्या ते मध्यम तसेच काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे.कापूस, सोयाबीन आणि मूग उडीद धान उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.अशीच काही परिस्थी मराठवाड्यातही आहे.
मराठवाड्यातही सध्या हवामान कोरडं आहे. उन्हाच्या झळा नागरिकांना बसत आहेत.पावसाअभावी खरीप पिकांवर संकट निर्माण झालं आहे. मराठवाड्यात चांगला पाऊस कधी होणार, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. परभणी,हिंगोली आणि नांदेडमध्ये उद्यापासून हवामानात काहीसा बदल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.राज्यभर पावसाने दडी मारली असली तरी हवामान विभागाच्या अंदाजानुसार ११ सप्टेंबरपासून राज्यात पाऊस सक्रीय होईल. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह बहुतांश महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या या अपडेटमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची आहे.



