DIRECT ATTACK: ‘आधी शेतकरी, कुंभमेळा नंतर; वडेट्टीवार आक्रमक

नागपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना सरकारने कुंभमेळा आणि शक्तिपीठ महामार्गासारख्या कामांपेक्षा शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांना मदतीला प्राधान्य द्यावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ‘एक वर्ष कुंभमेळ्यात डुबकी मारली नाही तरी चालेल; मात्र शेतकऱ्यांना भरीव मदत मिळाली पाहिजे,’ असा टोला त्यांनी सरकारला लगावला.
वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दुष्काळाच्या परिस्थितीबाबत निवेदन दिले. शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना तातडीने मदत देण्याची मागणी त्यांनी केली. दुष्काळग्रस्त भागात कोणताही भेदभाव न करता गरजू भागांना मदत आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी मांडली.
दुष्काळासाठी आमदारकीचा वर्षभराचा पगार देणार
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारला सहकार्य करण्याची भूमिका वडेट्टीवार यांनी स्पष्ट केली. आपले एका वर्षाचे आमदारकीचे मानधन मुख्यमंत्री दुष्काळ निधीत जमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गरज भासल्यास पुढील वर्षाचे मानधन देण्याचीही तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कुंभमेळा, शक्तिपीठाचा मुद्दा उपस्थित
दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता उपलब्ध निधीचा वापर दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी करण्याचा विचार सरकारने करावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. कुंभमेळा आणि शक्तिपीठ महामार्गासारख्या प्रकल्पांना प्राधान्य देण्याऐवजी सध्या शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मदत करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
ओबीसी जनगणनेसाठी तालुकास्तरावर आंदोलन
महात्मा गांधी जयंतीनिमित्त जातिनिहाय ओबीसी जनगणना आणि जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्याच्या मागणीसाठी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. अहिंसेच्या मार्गाने ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाज्योतीला १ हजार कोटींची मागणी
ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांसाठी महाज्योतीला १ हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, स्वाधार योजनेचा लाभ ओबीसी विद्यार्थ्यांना द्यावा तसेच एससी-एसटी विद्यार्थ्यांप्रमाणे तालुकास्तरावर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ओबीसी समाजातील प्रमुख प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी समाजातील प्रमुख नेत्यांची बैठक घेण्याची मागणीही त्यांनी केली.
पार्थ पवार प्रकरणावर सरकारवर आरोप
पार्थ पवार यांच्याशी संबंधित प्रकरणावर बोलताना वडेट्टीवार यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल होणे आवश्यक असल्याचे सांगितले. या प्रकरणात यापूर्वीच कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी होती, असा दावा करत सरकारच्या दबावामुळे कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. कायद्यापुढे सर्व समान असून राजकीय प्रभावामुळे कोणालाही संरक्षण मिळू नये, असे ते म्हणाले.
CJP आंदोलनाच्या निधीची चौकशी करण्याची मागणी
CJP आंदोलनाच्या निधीबाबतही वडेट्टीवार यांनी भूमिका मांडली. राज्य आणि केंद्रात सरकारची सत्ता असताना परदेशातून निधी येत असल्याचा आरोप होत असेल तर त्याची चौकशी करावी; केवळ आरोप करून उपयोग नाही, असे त्यांनी म्हटले.
लोकशाही आणि संविधानाने नागरिकांना आंदोलन, उपोषण आणि मोर्चाचा अधिकार दिला आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर सरकारने दबाव आणू नये. आंदोलन दडपण्याऐवजी संबंधितांच्या मागण्यांवर चर्चा करावी, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले.
‘शेतकरी, ओबीसी विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. या मागण्यांसाठी आपला संघर्ष सुरूच राहील,’ असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.



