महाराष्ट्र

Neelam Gorhe यांच्या बंगल्याच्या गच्चीवर पहाटे संशयास्पद तरुण सापडल्याने खळबळ

पुणे : शिवसेना नेत्या आणि विधान परिषद सदस्या नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील ‘सिल्वर रॉक्स’ निवासस्थानी पहाटेच्या सुमारास एक तरुण गच्चीवर आढळून आल्याने खळबळ उडाली. सुरक्षा रक्षक आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे संबंधित तरुणाला तातडीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्याजवळ हातोडा, पकड, दोरी आणि हातमोजे आढळल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटना २६ सप्टेंबर रोजी पहाटेची आहे . घटनेच्या वेळी नीलम गोऱ्हे पुण्याबाहेर होत्या. घरातील पाणीपुरवठा अचानक बंद झाल्यानंतर सुरक्षा रक्षकाने पाण्याच्या टाकीची पाहणी करण्यासाठी गच्चीवर गेला असतांना गच्चीवर एक अनोळखी तरुण असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर सुरक्षा रक्षकाने कर्तव्यावरील पोलिसांना माहिती दिली आणि तरुणाला ताब्यात घेतले .

गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, घराचा पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर पाण्याच्या टाकीजवळील कनेक्शन तपासण्यात आले. त्यावेळी पाण्याचे कनेक्शन तोडण्यात आल्याचे आढळले. त्यामुळे संबंधित तरुण गच्चीवर नेमका कशासाठी आला होता, याचा तपास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

CCTV फुटेजनुसार तरुण पहाटे तीनच्या सुमारास गच्चीवर गेल्याचे दिसते. सकाळपर्यंत तो तेथेच होता, अशी माहिती गोऱ्हे यांनी दिली. त्याच्याकडे आढळलेल्या वस्तूंमुळे या घटनेचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास पोलिसांनी करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

“संबंधित तरुण विद्यार्थी असल्याचे कागदपत्रांवरून दिसत असले तरी, कोणत्याही व्यक्तीच्या घरात हत्यारासह इतका वेळ थांबण्याचे कारण काय, हे तपासातून स्पष्ट झाले पाहिजे,” असे गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, संबंधित तरुणाला सोडण्यासाठी काही व्यक्तींनी पोलिसांशी संपर्क साधल्याची चर्चा आपल्या कानावर आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, पोलिस आयुक्तांनी कोणत्याही दबावाचा तपासावर परिणाम होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेमागे पोलिटिकल मोटिव्ह आहे का, चोरीचा प्रयत्न होता का किंवा अन्य काही कारण होते का, हे सध्या स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या तपासातूनच याबाबत नेमकी माहिती समोर येईल, असे गोऱ्हे यांनी सांगितले.

गोऱ्हे यांनी यापूर्वीही आपल्या निवासस्थानी दगडफेक आणि धमकीचे प्रकार घडल्याचा उल्लेख केला. त्यामुळे घराच्या सुरक्षेचे पुन्हा सिक्यूरिटी अससमेंट करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. परिसरातील अपुरा प्रकाश आणि काही ठिकाणी बंद असलेल्या रस्त्यावरील दिव्यांकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.सध्या शिवाजीनगर पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, तरुण गच्चीवर कसा पोहोचला, त्याचा उद्देश काय होता आणि त्याच्याकडे आढळलेल्या वस्तूंचा वापर कशासाठी होणार होता, याचा तपास केला जात आहे.

Related Articles

Back to top button