Sunetra Pawar शेतकऱ्यांच्या बांधावर; Soybean Crop नुकसानाची पाहणी, म्हणाल्या- ‘वाऱ्यावर सोडणार नाही

नांदेड : अतिवृष्टी आणि पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध भागांचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
नांदेड जिल्यातील लोहा शहरालगत धावरी फाटा येथे सुनेत्रा पवार यांनी शेतकरी शिवाजी वाघमारे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. पिकाची सध्याची स्थिती, पावसामुळे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन जाणून घेतल्या.
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांनी मदतीचे आश्वासन दिले. “मी कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे,” असे त्या म्हणाल्या.
शेतकऱ्यांच्या लेकरा-बाळांचे शिक्षण, जनावरांसाठी चारा आणि कुटुंबाच्या दैनंदिन गरजांकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पावसामुळे अनेक भागांत शेतीचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विविध भागांचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याचा हा सिलसिला सुरू असतानाच आता सुनेत्रा पवार यांनी नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे सोयाबीन पिकाची पाहणी केली.
शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष शेतात जाऊन समजून घेतल्यानंतर त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचेही त्यांनी सांगितले.



