NCMC कार्ड बायोमेट्रिक जुळत नाही,….. पर्याय ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) NCMC कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांसाठी कार्ड नोंदणी करतांना ज्येष्ठ नागरिकांचे बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे जुळत नसल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. मात्र आता आधारकार्ड संलग्न भ्रमणध्वनी क्रमांकावर प्राप्त OTPच्या आधारे NCMC कार्डची नोंदणी करता येणार असल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.
बायोमेट्रिक जुळत नसल्यास आधार OTPचा पर्याय
NCMC कार्डची नोंदणी करतांना
ज्या अमृत ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांच्या बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे जुळत नाही, अशा लाभार्थ्यांनी सोमवार पासून आपल्या आधारकार्ड संलग्न भ्रमणध्वनी क्रमांकावर OTPच्या आधारे NCMC कार्डची नोंदणी करता येणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
त्यासोबतच 21 सप्टेंबरपासून हरवलेले अथवा चोरीला गेलेले NCMC कार्ड ब्लॉक करून रु. १९९ शुल्क भरून नव्याने नोंदणी करून नवीन कार्ड घेता येणार आहे.१९ सप्टेंबरपर्यंत NCMC कार्डसाठी नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना २५ सप्टेंबर २०२६ पासून कार्ड मिळणार आहे.
NCMC कार्डसाठी नोंदणी करणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांना QR कोड असलेली पावती देण्यात येणार आहे. ही पावती एसटीच्या ईटीआयएम मशीनवर स्कॅन केल्यानंतर संबंधित सवलतधारकाला सवलतीचे तिकीट मिळणार आहे. ही नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार आहे. दरम्यान, नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनी ३० दिवसांच्या आत NCMC कार्ड Active करून त्यामध्ये Top-up करणे आवश्यक आहे. त्यामुळे सवलतीचा प्रवास अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करावी.एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ मिळविण्यासाठी सर्व संबंधित सवलतधारक लाभार्थ्यांनी तात्काळ NCMC कार्ड नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.



