महाराष्ट्र

SSC-HSC Students: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षा शुल्क न घेता भरले जाणार अर्ज

मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांमधील इयत्ता १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत सर्व विभागीय मंडळांना सूचना दिल्या आहेत.

दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता ऑनलाइन परीक्षा आवेदनपत्रे भरून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

२५ सप्टेंबरच्या शासन निर्णयानंतर कार्यवाही

मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी करून राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती जाहीर केली आहे. या भागातील नागरिकांना विविध सवलती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीचाही समावेश आहे.

याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने आगामी SSC आणि HSC परीक्षा २०२७ संदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना तातडीने सूचना

दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना याबाबत तातडीने माहिती देण्याच्या सूचना विभागीय मंडळांना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता त्यांचे ऑनलाइन आवेदनपत्र भरून घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत.

दरम्यान, परीक्षा शुल्कमाफीबाबतच्या सविस्तर सूचना राज्य मंडळाकडून स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार आहेत. विभागीय मंडळांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवालही राज्य मंडळाकडे तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button