महाराष्ट्रमुंबई

‘पार्टिसिपेट मुंबई’ केवळ CSR प्लॅटफॉर्म नाही; समाजासाठी एकत्र काम करण्याचे व्यासपीठ

मुंबई : कॉर्पोरेट क्षेत्राला सामाजिक काम करण्याची इच्छा असते; मात्र निधी नेमका कुठे आणि कशा पद्धतीने वापरला जावा, याबाबत अनेकदा स्पष्टता नसते. अशा परिस्थितीत कॉर्पोरेट क्षेत्र, सामाजिक संस्था, शासन आणि महापालिका यांनी एकत्र येऊन परिणामकारक काम करण्यासाठी ‘पार्टिसिपेट मुंबई’ हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

‘पार्टिसिपेट मुंबई’ हा उपक्रम मुंबई महानगरपालिकेकडून राबवण्यात येत आहे.यात खासगी कंपन्या आपल्या सीएसआर निधी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमासाठी राबवू शकतील.त्यासाठी पालिकेने विशेष व्यवस्था केली आहे अशा एक खिडकी योजनेचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आज मुंबई महापालिका सभागृहात संपन्न झाला.या सोहळ्याला मुंबईचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा,महापौर रितू तावडे,उपमहापौर संजय घाडी,आयुक्त अश्विनी भिडे सर्व समित्यांचे अध्यक्ष सभागृह नेते गणेश खनकर,नगरसेवक उपस्थित होते.

हा केवळ CSR निधी उभारण्याचा प्लॅटफॉर्म नसून, समाजासाठी शासन, महापालिका, उद्योगजगत आणि सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन काय करता येईल, यासाठीची भागीदारी असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. किती निधी खर्च झाला यापेक्षा त्या निधीतून समाजावर किती सकारात्मक परिणाम झाला, हे CSR कामाचे खरे मोजमाप असले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

कॉर्पोरेट जगतात चांगले काम करण्याची इच्छा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अनेकदा नेमके काय करावे, कुठे निधी द्यावा आणि त्याचा अपेक्षित परिणाम कसा साधता येईल, याबाबत मार्गदर्शनाची गरज असते. ‘पार्टिसिपेट मुंबई’च्या माध्यमातून ही भागीदारी अधिक गतिशील आणि परिणामकारक करता येईल, असे फडणवीस म्हणाले.

पाणी, आरोग्य, शिक्षण, पोषण यांसारख्या क्षेत्रांत काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनाही या व्यासपीठावर आपले प्रकल्प मांडता येतील. त्यातून कोणत्या क्षेत्रात सहभागी होता येईल, याची संधी उद्योगांना मिळेल. शासन आणि महापालिकेच्या कामकाजात ठरावीक प्रक्रिया पाळावी लागते; मात्र अनेक वेळा अपेक्षित परिणाम साधण्यासाठी आवश्यक असलेली लवचिकता CSRच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते, असे फडणवीस यांनी नमूद केले.

‘किती पैसे खर्च केले’पेक्षा ‘किती परिणाम झाला’ महत्त्वाचा

मुंबईसारख्या महानगरातही कुपोषण, स्टंटिंग आणि वेस्टिंगसारख्या समस्या कायम असणे ही चिंतेची बाब आहे. पोषणाच्या क्षेत्रात अधिक परिणामकारक काम करण्याची गरज आहे. पुढील पिढीची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करण्यासाठीही प्रभावी प्रकल्प राबवता येऊ शकतात. यासाठी केवळ मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यापेक्षा त्यातून प्रत्यक्षात किती परिणाम साधला गेला, यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले.

सरकारी यंत्रणेची कार्यपद्धती बदलण्याची गरज

आजच्या काळात नागरिकांना केवळ प्रक्रिया नको, तर तातडीने परिणाम हवा आहे. एखादी समस्या समाजमाध्यमांवर मांडली गेल्यानंतर ती तातडीने सुटावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. त्यामुळे पारंपरिक ‘प्रोसेस’ आणि ‘डिलिव्हरी सिस्टिम’मध्ये बदल करणे गरजेचे आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

शासकीय फाईल अनेक टेबलांवर फिरत राहण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. काही ठिकाणी अनावश्यक विलंब होतो. प्रशासनाने स्वतःचे कर्तृत्व फाईल किती ठिकाणी फिरली यावर नव्हे, तर नागरिकांना सेवा किती वेगाने मिळाली यावर सिद्ध केले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत नागरिकांना सुमारे १,१०० सेवा अधिक वेगवान पद्धतीने कशा देता येतील, यावर काम करण्यात आले. यातील काही सेवा अशा होत्या की त्यांची मागणीच होत नव्हती. त्यामुळे सेवा आणि योजनांचे पुनर्मूल्यांकन करून नागरिकांना प्रत्यक्षात आवश्यक असलेल्या सेवा अधिक प्रभावीपणे देण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

AIच्या माध्यमातून बांधकाम परवानग्यांचे स्वप्न

महापालिकेच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याची गरज असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून बांधकाम आराखड्यांना मान्यता देण्याची प्रक्रिया भविष्यात पूर्णपणे स्वयंचलित करण्याचे उद्दिष्ट असावे. ‘झिरो ह्युमन इंटरव्हेन्शन’च्या माध्यमातून बिल्डिंग प्लॅन मंजूर होण्याचा दिवस आपल्याला पाहायचा आहे, असे फडणवीस म्हणाले.

‘बाहेरून येऊन मुंबई काय चालवणार?’ मानसिकता मोडावी

मुंबईच्या विकासावरून राजकीय टोला लगावताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ‘तुम्ही बाहेरून येऊन मुंबई काय चालवणार, ही मानसिकता आहे. ही मानसिकता मोडून काढली पाहिजे,’ असे फडणवीस म्हणाले.

मुंबईच्या विकासात शासन, महापालिका, उद्योगजगत, सामाजिक संस्था आणि नागरिक या सर्वांची भागीदारी वाढवून परिणामकारक काम उभे करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button