दुष्काळसदृश स्थितीमुळे राष्ट्रवादीचे नाशिक शिबीर पुढे ढकलले

मुंबई : राज्यातील १९ जिल्ह्यांत पावसाच्या खंडामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे नियोजित एक दिवसीय राज्यव्यापी शिबीर पुढे ढकलले आहे.
पक्षाच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, खासदार पार्थ पवार यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला.
पक्षाच्या प्रसिद्धिपत्रकानुसार, सध्या सरकारच्या माध्यमातून दुष्काळाच्या संकटाचा आढावा सुरू आहे. १९ जिल्ह्यातील पीक, चारा आणि पाणी परिस्थिती काळजीची असल्याने शेतकरी हवालदिल आहेत. या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच शिबीर घेण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या मंत्र्यांना, नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आपापल्या परिसरातील संभाव्य दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधून उपाययोजनांवर भर देण्याचे आवाहन केले.



