महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela 2026 : “नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात अहिंदूंना पूर्ण प्रवेशबंदीच करा”; ‘धर्मादेश’द्वारे संत -महंतांचे सरकारला आवाहन…

मुंबई : नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हिंदू धर्मातील धार्मिक आणि अध्यात्मिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या कुंभपर्वाच्या ऐतिहासिकता आणि अध्यात्मिकतेविषयी नाशिक येथे नुकताच ज्ञानकुंभ २०२६ आयोजित करण्यात आलेला होता. याच ज्ञानकुंभात सर्व संत-महंत, शास्त्री- पंडितांच्या उपस्थितीत धर्मादेश संमत करण्यात आला. हाच ‘धर्मादेश’ १ ऑक्टोबर या दिवशी महाराष्ट्र शासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. नाशिक सिंहस्थ कुंभपर्वाची धार्मिक परंपरा आणि इतिहास यांची अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आली आहे. या महान संस्कृतीच्या परंपरेचे रक्षण व्हावे, यासाठी नाशिक सिंहस्थ कुंभपर्वामध्ये अहिंदूंना प्रवेश बंदी, तसेच अन्य धर्मियांच्या दुकानांवर बंदी असावी, अशी १ ऑक्टोबर या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली.

सिंहस्थ कुंभपर्वामध्ये या धर्मादेशाचे पालन व्हावे, यासाठी राज्यशासनाने सहकार्य करावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्याकडेही धर्मादेशाची प्रत सुपूर्द करण्यात येणार आहे, अशी माहिती महंत अनिकेतशास्त्री यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, महंत अनिकेत शास्त्री, आखाडा परिषदेचे महंत भक्तीचरणदास महाराज, श्री गंगा-गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाचे विश्वस्त सतीश शुक्ल, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी, श्री श्री १००८ श्री मौनीबाबा धर्मादाय ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉ. अभिषेक उपाध्याय, पंडित संकेत टोके, काशी विद्वद परिषदेचे संघटनमंत्री संजय त्रिपाठी, अखिल भारतीय संत समिती धर्म समाजाचे संपर्कप्रमुख संदीप सोनजे उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला महंत डॉ. अनिकेतशास्त्री यांनी या धर्मादेशाची पार्श्वभूमी समजावून सांगितली. सिंहस्थ कुंभमेळा ही हिंदूंसाठी पर्वणी असून कुठल्याही प्रकारे त्याचा पावित्र्यभंग होऊ नये यासाठी संतसमाज आणि हिंदू समाज कटीबद्ध आहे असे त्यांनी ठणकावून सांगितले आणि राज्यातील हिंदुत्त्ववादी सरकार यामध्ये नक्की सहकार्य करेल असा विश्वास देखील व्यक्त केली.

काय आहे ‘धर्मादेश’!

सप्टेंबर मासात नाशिक येथे ‘ज्ञानकुंभ २०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध धर्मपिठांचे प्रतिनिधी, संत-महंद सहभागी झाले होते. यामध्ये वेद, पुराण, उपनिषद, ब्रह्मसूत्र, इतिहास, ज्योतिष आदींचा संदर्भ घेऊन ५०० पानांचे धर्मशास्त्रीय संशोधन करण्यात आले. हाच ‘धर्मादेश’ शासनाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. ‘अहिंदूना सिंहस्थ कुंभपर्वामध्ये यायचे असल्यास हिंदु धर्मावर त्यांची श्रद्धा असणे आवश्यक आहे’, अशी अट धर्मादेशात घालण्यात आली आहे.

हिंदु धर्म मानत नसाल, तर कुंभपर्वाला येऊ नका – रणजित सावरकर

सिंहस्थ कुंभपर्व हे काही पर्यटनाचे स्थान नाही, हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे ज्यांची हिंदु धर्मावर श्रद्धा आहे, त्यांना कुंभपर्वात प्रवेश असावा. संत, महंत, धर्माचार्य यांनी सांगितल्यानुसारच सिंहस्थ कुंभपर्व व्हायला हवा. ‘हदीस’नुसार मुसलमानव्यतिरिक्त अन्य धर्मिंयांच्या श्रद्धास्थानांची पूजा म्हणजे सैतानाची पूजा मानली जाते. त्यामुळे त्या पूजेचा प्रसादही भ्रष्ट करण्यास सांगितले जाते. त्यामुळे अन्य धर्मियांकडून हिंदूंच्या मंदिराबाहेर दिला जाणारा प्रसादही भ्रष्ट करूनच विकला जाण्याची शक्यता आहे. ‘थुंक जिहाद’ याचेच उदाहरण आहे. असे सडेतोड प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले.

गोमांस भक्षकांना कुंभपर्वात प्रवेश हा हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अवमान – डॉ. उदय धुरी

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीवर मुसलमानांनी अंडी फेकण्याचे प्रकार घडले. कावड यात्रेमध्ये दंगा करण्यात आला. जे मूर्तीपूजा मानत नाहीत, गोमांस भक्षण करतात अशांना कुंभपर्वात दुकाने उभारायला अनुमती असू नये. अशांचा कुंभपर्वामध्ये प्रवेश म्हणजे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार होय, अशा शब्दांत हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी आपली भूमिका मांडली.

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

आचार्य अभिषेक उपाध्याय म्हणाले, ‘‘भारतात मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे; मात्र मशिदी आणि चर्च स्वतंत्र आहेत. हिंदुत्व हा भारताचा सांस्कृतिक आत्मा आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजनही धर्मादेशानुसार करण्यात यावे.’’

महंत भक्तीचरणदास म्हणाले, ‘‘प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ मेळ्यात अहिंदूंना प्रवेशबंदी होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने नाशिक सिंहस्थ कुंभपर्वातही अहिंदूंना प्रवेशबंदी लागू करावी.’’

सतीश शुक्ल म्हणाले, ‘‘कुंभपर्वात पवित्र स्नानासाठी जगभरातून भाविक येतात. त्यांच्या मनात कुंभपर्वाच्या धार्मिक परंपरा आणि विधींविषयी अनेक प्रश्न असतात. त्यामुळे कुंभपर्वाचे आयोजन करताना धर्मशास्त्राचा अभ्यास आणि त्याची योग्य माहिती असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र तसेच केंद्र सरकारने या धर्मादेशाच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे.’’

अशा पद्धतीने सर्व धार्मिक आणि अध्यात्मिक संघटनांच्या प्रमुखांनी आपली भूमिका मांडली आणि त्याद्वारे हिंदू समाजाला आवाहन केले की या हिंदू समाजाच्या सर्वोच्च पवित्र पर्वांपैकी असलेला सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करावा आणि एकजूटीने त्याचे पावित्र्य राखावे.

Related Articles

Back to top button