OBC Meeting : जातिनिहाय जनगणनेसाठी नागपुरात मोठी बैठक; दिल्लीतील आंदोलनाची रणनीती ठरणार…
नागपूर : जातिनिहाय जनगणनेच्या मागणीला राष्ट्रीय स्तरावर बळ देण्यासाठी देशभरातील ओबीसी संघटनांची राष्ट्रीय बैठक ११ ऑक्टोबरला नागपुरात होणार आहे. हॉटेल सेंटर पॉईंट येथे होणाऱ्या या बैठकीला देशभरातून सुमारे १५० प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
तामिळनाडूपासून काश्मीरपर्यंतच्या विविध राज्यांतील ओबीसी संघटनांचे नेते आणि प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत. विविध संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत जातिनिहाय जनगणना, ओबीसी समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय प्रश्न तसेच विविध राज्यांतील ओबीसींच्या मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे. जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम असावा, या मागणीवरही विचारविनिमय होणार आहे.
दिल्लीतील आंदोलनाची दिशा ठरणार
जातिनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी नोव्हेंबरमध्ये दिल्ली येथे देशव्यापी आंदोलन करण्याची तयारी सुरू आहे. या आंदोलनाची रूपरेषा आणि पुढील रणनीती नागपुरातील बैठकीत निश्चित केली जाणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
देशभरातील ओबीसी संघटनांना एका व्यासपीठावर आणून जातिनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी एकजूट निर्माण करणे, हा बैठकीचा उद्देश असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
ओबीसींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय्य हक्क मिळावेत, यासाठी केंद्र सरकारकडे कोणत्या मागण्या मांडायच्या, यावरही बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे ११ ऑक्टोबरच्या या बैठकीतून ओबीसींच्या देशव्यापी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.



