नागपूर – मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; तीन डब्यांच्या काचा फुटल्या

नागपूर : नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेन क्रमांक १२२९० दुरंतो एक्स्प्रेसवर शुक्रवारी रात्री दगडफेक झाल्याची घटना घडली. बोरखेडी स्थानक ओलांडल्यानंतर रात्री सुमारे ८.२७ वाजता अज्ञात व्यक्तीने ट्रेनच्या दिशेने दगड किंवा वस्तू फेकल्याने ए-१, बी-२ आणि बी-५ या डब्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाल्याचे समोर आलेले नाही.
घटनेची माहिती रात्री सुमारे ८.४६ वाजता मिळाल्यानंतर आरपीएफ आणि जीआरपीच्या कर्मचाऱ्यांनी बोरखेडी-सिंधी सेक्शनमधील किलोमीटर क्रमांक ८०३ ते ७९६ दरम्यान शोधमोहीम राबवली. बोरखेडी आणि ब्राह्मणी गावांच्या परिसरातही तपास करण्यात आला. पोलीस पाटील तसेच स्थानिक रहिवाशांची चौकशी करण्यात आली; मात्र संशयित व्यक्ती किंवा ठोस पुरावा आढळून आला नाही.
एस्कॉर्ट कर्मचाऱ्यांसह प्रवाशांनी रात्री सुमारे ८.२७ वाजता बाहेरून खिडक्यांवर दगड किंवा अन्य वस्तू आदळल्याची पुष्टी केली आहे. मात्र, दगडफेक नेमकी कोणत्या ठिकाणी झाली, याचा तपास अद्याप सुरू आहे.
दरम्यान, २६ सप्टेंबर रोजी पहाटे २.५५ वाजता रेल्वे कायदा कलम १५३ अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा क्रमांक ३२५/२०२६ नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आरपीएफ-जीआरपीकडून सुरू आहे.



