महाराष्ट्र

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसमधून 1.96 कोटींचे सोने जप्त; RPF आणि DRIची मोठी कारवाई

नागपूर: नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसमध्ये RPF आणि DRIच्या पथकाने संयुक्त कारवाई करत तब्बल 1.242 किलो परदेशी सोने जप्त केले आहे. या सोन्याची अंदाजे किंमत 1 कोटी 96 लाख 307 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

गुप्त माहितीच्या आधारे रािपूर आणि नागपूर RPF क्राइम ब्रँचने DRI नागपूरच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई केली. भंडारा आणि नागपूरदरम्यान ट्रेनच्या B-12 कोचमध्ये दोन संशयित प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले.

तपासणीदरम्यान त्यांच्या ताब्यातून सोन्याचे सात बिस्किटे आणि एक गोल्ड बार आढळून आला. जप्त करण्यात आलेले सोने परदेशी असल्याचे तपासात समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायपूरहून नागपूरकडे येणाऱ्या दुरंतो एक्स्प्रेसमध्ये सोने असल्याची माहिती RPFच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पथकाने ट्रेनमध्ये तपासणी सुरू केली. भंडारा आणि नागपूरदरम्यान B-12 कोचमध्ये दोन संशयित व्यक्तींवर पथकाला संशय आला. त्यांची झडती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात सोने आढळून आले.

यानंतर दोन्ही संशयितांना जप्त केलेल्या सोन्यासह DRI नागपूरच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणात DRIने कस्टम्स अॅक्ट, 1962च्या कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

हे सोने नेमके कुठून आणण्यात आले होते, ते कुठे पोहोचवले जाणार होते आणि या कथित तस्करीच्या नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास DRIकडून केला जात आहे. सुमारे दोन कोटी रुपयांचे परदेशी सोने जप्त झाल्यामुळे तपास यंत्रणांचे लक्ष आता या कथित आंतरराज्य तस्करी नेटवर्कच्या मुळापर्यंत पोहोचण्यावर आहे.

Related Articles

Back to top button