महाराष्ट्र

मुंबई समाचारच्या मराठी वेबसाइटचे आज उद्घाटन; २०५ वर्षांची परंपरा आता डिजिटल वर

मुंबई: दोन शतकांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात विश्वासार्ह ठसा उमटविणाऱ्या ‘मुंबई समाचार’चा मराठी डिजिटल अध्याय आजपासून सुरू होत आहे. ‘मुंबई समाचार’च्या मराठी वेबसाइटचे आज अधिकृत उद्घाटन होत असून, महाराष्ट्रातील वाचकांसाठी बातम्यांचे नवे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

२०५ वर्षांची पत्रकारितेची परंपरा आणि आधुनिक डिजिटल माध्यम यांची सांगड घालत ‘मुंबई समाचार’ने मराठी भाषिक वाचकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडींना या वेबसाइटवर विशेष स्थान दिले जाणार आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाज, व्यवसाय, मनोरंजन, क्रीडा तसेच विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचविण्यात येणार आहेत.

डिजिटल माध्यमाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन वेबसाइटची रचना करण्यात आली आहे. मोबाइलवर सहज वाचता येतील अशा स्वरूपात बातम्या, फोटो, व्हिडिओ आणि महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

‘मुंबई समाचार’ने यापूर्वी गुजराती आणि इंग्लिश डिजिटल माध्यमातून आपली छाप सोडली आहे. आता मराठी भाषेत स्वतंत्र वेबसाइट सुरू करून महाराष्ट्रातील वाचकांशी थेट जोडण्याचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Related Articles

Back to top button