
मनोज कुळकर्णी
मुंबई: अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून वंचित घटकांना आरक्षणाचा स्वतंत्र वाटा मिळावा, या मागणीसाठी मातंग समाजाने मंगळवारी मुंबईतील आझाद मैदानावर आक्रमक आंदोलन केले. राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने समाजबांधव मुंबईत दाखल झाले असून, उपवर्गीकरणाबाबत शासन निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आंदोलनादरम्यान आझाद मैदान परिसरात रस्ता रोको करण्यात आल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला.
महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या १३ टक्के आरक्षणात ५९ जातींचा समावेश आहे. या आरक्षणाचे ‘अ, ब, क, ड’ अशा पद्धतीने उपवर्गीकरण करून आरक्षणाचा लाभ तुलनेने वंचित राहिलेल्या घटकांपर्यंत पोहोचवावा, अशी मातंग समाजाची प्रमुख मागणी आहे. सध्याच्या व्यवस्थेत काही मोजक्या जातींनाच आरक्षणाचा अधिक लाभ मिळत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्याकडून समिती
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ रोजीच्या निकालामुळे मोकळा झाला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने या विषयाचा अभ्यास करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली. या समितीने १६ मार्च २०२६ रोजी आपला अहवाल शासनाकडे सादर केला. मात्र, अहवालावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलै महिन्यातील पावसाळी अधिवेशनादरम्यान दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचा दावा आंदोलकांकडून करण्यात आला. मात्र, त्यानंतरही निर्णय न झाल्याने समाजात नाराजी वाढल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
निर्णय होईपर्यंत मुंबई न सोडण्याचा इशारा
उपवर्गीकरणाचा शासन निर्णय जारी होईपर्यंत मुंबई सोडणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी यापूर्वीच जाहीर केली होती. त्यानुसार मंगळवारी आझाद मैदान परिसरात मोठ्या संख्येने आंदोलक जमले. आंदोलनाला आक्रमक स्वरूप प्राप्त झाल्यानंतर काही ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला. त्यामुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला असून पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरात यापूर्वीही विविध मोर्चे आणि आंदोलने करण्यात आली आहेत. आता मुंबईतील महामोर्चाच्या माध्यमातून सरकारवर निर्णयासाठी दबाव वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.



