‘आई अजून रडत असते का? तिला सांगा रडू नको…’; वडिलांचा आवाज ऐकून ‘अजित सृष्टी’त जय पवार भावुक, डोळ्यांत तरळले अश्रू

पुणे: पुण्यातील आंबेगाव परिसरात गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेल्या ‘अजित सृष्टी’ या विशेष देखाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी भेट दिली. वडील अजित पवार यांच्या जीवनकार्यावर आणि आठवणींवर आधारित हा देखावा पाहताना जय पवार अत्यंत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
वडिलांचा आवाज ऐकताच डोळे पाणावले
मंगळवारी, २२ सप्टेंबर रोजी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर जय पवार यांनी आंबेगाव येथील या देखाव्याला भेट दिली. स्थानिक कार्यकर्ते युवराज बेलदरे यांनी या देखाव्याची निर्मिती केली आहे. जय पवार देखावा पाहत असतानाच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या आवाजातील जुने भाषण सुरू होते.
त्या भाषणातील “आई अजून रडत असते का? तिला सांगा रडू नको म्हणून…” हे शब्द कानावर पडताच जय पवार काही क्षण स्तब्ध झाले. वडिलांचा आवाज आणि ते शब्द ऐकून त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्यांनी तात्काळ डोळे पुसले आणि अत्यंत भावुक वातावरणात श्री गणेशाची आरती संपन्न केली.
कार्याची आणि आठवणींची झलक
‘अजित सृष्टी’च्या माध्यमातून अजित पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील विविध टप्पे, समाजोपयोगी कार्य आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. या वेळी युवराज बेलदरे यांच्यासह पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वडिलांच्या आठवणींनी भारलेल्या या वातावरणात जय पवारांचे पाणावलेले डोळे पाहून उपस्थित कार्यकर्तेही काही काळ हेलावून गेले.



