ठाण्याला जाणारा १.१३ कोटींचा गुटखा चाकणमध्ये जप्त

पुणे : राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही राजरोसपणे गुटखा माफिया विक्री करत आहेत.पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन वेळोवेळी कारवाही करत आहेत.अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी तुकाराम मुंढे आरूढ आल्यापासून विविध ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे.पुणे विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाही करत गुटख्याचा मोठा साठा पकडला.
राज्याच्या शेजारील मध्य प्रदेशातून ठाण्यात विक्रीसाठी पाठविण्यात आलेला तब्बल १ कोटी १३ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने जप्त केला. सुमारे सहा तास पाठलाग केल्यानंतर चाकण-तळेगाव चौकात ट्रक अडवून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी चाकण उत्तर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातून ठाण्याच्या दिशेने निघालेला ट्रक नियोजित मार्ग बदलून संगमनेरमार्गे पुण्याकडे येत असल्याची माहिती एफडीएच्या पथकाला मिळाली. त्यानंतर ठाणे विभागाचे पथक मुरबाडच्या दिशेने, तर पुणे विभागाचे पथक राजगुरुनगर येथे तैनात करण्यात आले.
राजगुरुनगर टोलनाक्यावर अन्नसुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सावळे यांनी संशयित ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने ट्रक न थांबवता भरधाव वेगाने पुढे नेला. त्यानंतर पथकाने पाठलाग सुरू ठेवत अखेर चाकण-तळेगाव चौकात ट्रक अडवला.
ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये विविध ब्रँडचा पानमसाला आणि जर्द्याचा मोठा साठा आढळून आला. यामध्ये पानमसाला २९.९५ लाख रुपये, तानसेन सुगंधित पानमसाला २४.९४ लाख रुपये, आरएमडी पानमसाला २६.४० लाख रुपये, तुळशी रॉयल जाफरानी जर्दा ९.६० लाख रुपये आणि टी.ओ. प्रीमियम जर्दा २.६४ लाख रुपये किमतीचा साठा आहे.
बंदी असलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक केल्याप्रकरणी ट्रकचालक नफीस मेहबूब खान (४०, हरियाणा), पुरवठादार निलेश राठी (खामगाव, बुलढाणा), अरुण पाटील (जळगाव), धुळे येथील वाहनमालक मे. जे.एम.डी. एंटरप्रायझेस आणि इंदूर येथील वाहतूकदार संजय माटा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफडीएच्या या कारवाईमुळे महाराष्ट्रात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक पुन्हा एकदा समोर आली आहे.



