महाराष्ट्र

गणेशोत्सवात जरांगे मुंबईत धडकणार; मराठ्यांचे रक्त सांडले तर….

मुंबई
प्रशांत गोडसे


मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी आरक्षणाची शेवटची लढाई असल्याचे जाहीर केले. मुंबईतून आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी येणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली.

१५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीहून मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी जाहीर केला. वाटेत चार मुक्काम करून पाचव्या दिवशी म्हणजे १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात सकाळी १० वाजल्यापासून आंदोलन सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

आंदोलन पूर्णतः लोकशाही मार्गाने आणि शांततेतच करण्याचे आवाहन करतानाच, आंदोलनात मराठ्यांचे रक्त सांडले तर दहा मिनिटांत महाराष्ट्र बंद करण्याचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

मुंबईत आंदोलनात सहभागी होण्यासाठी महिलांना विशेष आवाहन करताना जरांगे पाटील म्हणाले, ‘‘अमृता ताई, लता ताईंकडे जायचं शांततेत हळदी-कुंकूसाठी. हिंदू असतील तर बाहेर येतील. हळदी-कुंकू सौभाग्याचं लेणं आहे. सौभाग्याचं लेणं आहे म्हणून नवऱ्याला जाऊन सांगतील, मराठ्यांना आरक्षण द्या.’’

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू असताना मंत्री उदय सामंत, राधाकृष्ण विखे-पाटील आणि प्रसाद लाड यांनी शिष्टाईचे प्रयत्न केले. मात्र समाधान न झाल्याने आंदोलन सुरूच ठेवले असून आता मुंबईत धडक देण्याचा निर्णय घेतल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. जो आपला नाही त्याला निवडणुकीत पाडायचे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

सरकारला पर्याय
जरांगे पाटील यांनी सरकारला तीन पर्याय सुचवले. आजपासून मुंबईत पोहोचेपर्यंत मराठ्यांच्या मागण्या मान्य करण्याची संधी सरकारला आहे. आंदोलन नको असेल तर सरकारने अंतरवालीत येऊन मागण्या मान्य कराव्यात. आंदोलन सुरू झाल्यानंतर वाटेत चर्चा करायची असेल तर माध्यमांसमोर जाहीर चर्चा करावी, असे त्यांनी सांगितले.

मुख्य मागण्या
हैदराबाद गॅझेटच्या जीआरनुसार प्रमाणपत्रे द्यावीत.
सातारा, बॉम्बे, कोल्हापूर, पुणे आणि औंध गॅझेट लागू करावे.
५८ लाख कुणबी नोंदीनुसार प्रमाणपत्रे द्यावीत.
मराठा-कुणबींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे.
ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात कुणबी नोंदी लावाव्यात.
मराठ्यांनाही ओबीसीच्या सवलती लागू कराव्यात.
सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत.
सगेसोयऱ्यांच्या दाखल्यांची पडताळणी करावी.
सारथी मार्फत प्रलंबित शिष्यवृत्ती योजनांचा लाभ द्यावा.
डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती वितरित करावी.
आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी व आर्थिक लाभ द्यावा.
EWS / SEBC / ESBC मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या कराव्यात.
मराठा तरुणांना दिलेल्या वाहनांचा व्याज परतावा द्यावा.

बावनकुळे व कलेक्टरबाबत
कलेक्टरबाई तीन वेळा आल्या. त्यांना मी ताईच म्हणालो. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. बावनकुळेंचा गैरवापर करू नका. प्रसाद लाड यांच्यामुळे मी बावनकुळेंना काही बोलत नाही, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले

Related Articles

Back to top button