गणेशभक्तांच्या कोकण प्रवासाला टोलमाफी; ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान पथकरातून सवलत
मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरातून (टोल) सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही टोलमाफी लागू राहणार आहे.
मुंबई–बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८, मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील कोकणाकडे जाणाऱ्या संबंधित मार्गांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत मिळणार आहे. याशिवाय अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावा शेवा अटल सेतूमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांनाही टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भात ८ सप्टेंबर २०२६ रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे.
स्वतंत्र पासची व्यवस्था
टोलमाफीचा लाभ घेताना गणेशभक्तांना अडचण येऊ नये, यासाठी ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ अशा आशयाचा स्वतंत्र स्टिकर किंवा पास देण्यात येणार आहे. या पासवर वाहन क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केले जाणार आहे.
पोलिस ठाणे, वाहतूक पोलिस चौक्या आणि आरटीओ कार्यालयांसह आवश्यक त्या ठिकाणी हे पास उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. हा पास परतीच्या प्रवासासाठीही ग्राह्य राहणार असल्याने कोकणातून मुंबई किंवा इतर शहरांकडे परतताना गणेशभक्तांना पुन्हा टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.
एसटी बसलाही टोलमाफी
राज्याच्या विविध भागांतून कोकणाकडे जाणाऱ्या एसटी बसनाही पथकरमाफी देण्यात येणार आहे. संबंधित बससाठी आवश्यक पास पोलिस किंवा प्रादेशिक परिवहन विभागामार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनाही या निर्णयाचा फायदा होणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते. त्यामुळे टोल नाक्यांवर गर्दी होऊन वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिस, वाहतूक पोलिस, आरटीओ आणि एसटी महामंडळाने समन्वयाने नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
“गणेशोत्सव हा प्रत्येकाच्या भावनेशी जोडलेला सण आहे. कोकणातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि आनंददायी व्हावा, यासाठी शासनाने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे,” असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी सांगितले.



