महाराष्ट्र

गणेश स्थापनेसाठी शुभ मुहूर्त आणि विधी जाणून घ्या माहिती

मनोज कुळकर्णी 

मुंबई:
येत्या सोमवारी गणेश चतुर्थी आहे.गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे. आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी राज्यभर सुरूच आहे गणरायाच्या स्थापनेची विधिवत पूजा करण्याची काय आहे पद्धती ते पाहूया .

पंचांगानुसार, गणेश चतुर्थीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी रवी योग, इंद्र योग आणि ब्रह्म योग तयार होत आहेत.गणपतीची स्थापना आणि पूजेसाठी सर्वोत्तम वेळ १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून २१ मिनिटांनी सुरू होईल. दुपारी १ वाजून ४८ मिनिटांपर्यंत आहे. या वेळेत भाविकांनी  विधीवत पूजा करून घरगुती,सार्वजनिक किंवा कार्यालयीन  गणपतीची मूर्ती स्थापित करू शकता.

श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची मूर्ती घरी आणून तिची शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना आणि पूजा केली जाते. संपूर्ण गणेश स्थापना व पूजा विधी खालीलप्रमाणे आहे:

1. गणरायाच्या आगमनाची पूर्वतयारी

दिशा: पूजेचे ठिकाण स्वच्छ करून पूर्व किंवा  ईशान्य (उत्तर-पूर्व) दिशेला पूजेची चौरंग/पाट मांडावा. चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून त्यावर अक्षता (तांदूळ) किंवा गव्हाची रास घालावी.कलश स्थापना: तांब्याच्या किंवा पितळेच्या तांब्यात पाणी, दुर्वा, नाणे आणि सुपारी घालून त्यावर आंब्याची किंवा विड्याची पाने ठेवावीत आणि वर नारळ ठेवावा.

२. मूर्ती आगमन व स्थापना विधी

आगमन:  ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करत मूर्ती घरात आणावी तत्पूर्वी  मुख्य प्रवेशद्वारावर आरती ओवाळून मूर्तीचा प्रवेश करावा.

आसनस्थ करणे: अक्षतांच्या राशीवर मूर्तीची स्थापना करावी. मूर्तीचे मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे.

संकल्प: हातात पाणी, अक्षता व फुल घेऊन “मी माझ्या परिवाराच्या सुख, समृद्धी आणि शांतीसाठी श्री गणेशाची पूजा करत आहे,” असा मनःपूर्वक संकल्प सोडून ते पाणी ताम्हणात सोडावे.

३. षोडशोपचार पूजा (सोळा उपचार)

आवाहन व ध्यान: श्री गणेशाचे ध्यान करून त्यांना पूजेसाठी आमंत्रित करावे.

अभिषेक/मूर्ती पूजा: मूर्ती मातीची असल्यास प्रत्यक्ष पाण्याने स्नान न घालवता, दुर्वा किंवा फुलाने पाण्याचे थेंब (प्रोक्षण) मूर्तीवर उडवावेत.

वस्त्र व जानवे: श्री गणेशाला लाल/पिवळे वस्त्र आणि जानवे (यज्ञोपवीत) अर्पण करावे.

गंथ व हळद-कुंकू: गणपतीला तांबडे चंदन (रक्तचंदन), हळद-कुंकू आणि अष्टगंध लावावे.

अलंकार व पत्री/पुष्प: लाल जास्वंदाचे फूल, शमीची पाने, बेलपत्र आणि ऋतूमानानुसार उपलब्ध पत्री अर्पण करावी.

दुर्वा अर्पण: ‘ॐ गं गणपतये नमः’ हा मंत्र म्हणत २१ दुर्वांची जुडी श्री गणेशाच्या चरणी अर्पण करावी.

धूप आणि दीप: धूप किंवा अगरबत्ती आणि तुपाचा दिवा लावून मूर्तीला दाखवावा.

४. नैवेद्य आणि आरती

नैवेद्य: गणपतीच्या प्रिय २१ मोदकांचा नैवेद्य दाखवावा. सोबत गूळ-खोबरे आणि फळांचा नैवेद्य ठेवावा. नैवेद्य दाखवताना पाण्याचा प्रोक्षण करून अर्पण करावा.

आरती:
‘सुखकर्ता दुखहर्ता’ ही आरती सर्व कुटुंबाने एकत्र मिळून म्हणावी. त्यानंतर कापूर लावून आरती ओवाळावी.

मंत्रपुष्पांजली व क्षमाप्रार्थना: हातात फुले आणि अक्षता घेऊन मंत्रपुष्पांजली म्हणावी आणि पूजेत काही चूकभूल झाली असल्यास गणपती बाप्पाकडे क्षमा मागावी. पूजेदरम्यान मन प्रसन्न ठेवून शांततेत व भक्तीभावाने विधी पार पाडावा.

मुंबई समाचार कडून सर्व गणेश भक्तांचे स्वागत आणि शुभेच्छा. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही गणरायाच्या चरणी प्रार्थना.

Related Articles

Back to top button