फ्लेक्समुक्त मुंबईसाठी महापौरांचा पुढाकार; सर्वपक्षीय सहकार्यासाठी नेत्यांना पत्र

मुंबई : मुंबईतील विद्रूपीकरणाला आळा घालण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून ‘शाडू बाप्पा दहा दिवस – फ्लेक्समुक्त मुंबई ३६५ दिवस’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. अनधिकृत पीव्हीसी फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्सविरोधात शून्य सहिष्णुतेचे धोरण स्वीकारण्याचे निर्देश महापौरांनी दिले असून, यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र दिले आहे.
या मोहिमेला सर्वपक्षीय पाठबळ मिळावे यासाठी महापौर स्वतः सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना आणि नेत्यांना पत्र पाठवून सहकार्याचे आवाहन करणार आहेत. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मुंबईच्या विद्रूपीकरणाविरोधात सर्वांनी एकत्र यावे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार अमित साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाची संयुक्त बैठकही लवकरच घेण्यात येणार आहे.
अधिकृत बॅनरवर QR कोड बंधनकारक
महापालिकेची परवानगी असलेल्या जाहिरातींवर परवाना क्रमांक, वैधता कालावधी, मुद्रकाचे नाव आणि अधिकृत QR कोड छापणे बंधनकारक करण्यात येणार आहे. QR कोड स्कॅन करून संबंधित फलक अधिकृत आहे की नाही, याची माहिती गस्ती पथकांसह नागरिकांनाही मिळू शकणार आहे. QR कोड नसलेले फलक, बॅनर्स आणि पोस्टर्स अनधिकृत ठरवून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
प्रिंटर्स, एजन्सींवर काळ्या यादीची कारवाई
वारंवार अनधिकृत फ्लेक्स, बॅनर्स किंवा पोस्टर्स छापणारे प्रिंटर्स, कंत्राटदार आणि जाहिरात एजन्सींवर दंडात्मक कारवाईबरोबरच काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे. पीव्हीसीऐवजी कापडी, पर्यावरणपूरक साहित्य तसेच डिजिटल एलईडी माध्यमांचा वापर करण्यासही प्रोत्साहन दिले जाणार आहे.
परवान्यांसाठी डिजिटल ‘सिंगल विंडो’
महापालिकेच्या विद्यमान बाह्य जाहिरात धोरणात कालानुरूप सुधारणा करून परवानगीची प्रक्रिया ‘सिंगल विंडो’ डिजिटल प्रणालीद्वारे करण्यावर भर देण्यात येणार आहे. या माध्यमातून परवानगी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्याबरोबरच अनधिकृत जाहिरातींमुळे बुडणारा परवाना महसूल वाचवून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जप्त फ्लेक्सची शास्त्रोक्त विल्हेवाट
कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले पीव्हीसी आणि प्लास्टिक साहित्य पुन्हा रस्त्यावर किंवा नाल्यांमध्ये जाऊ नये, यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून पुनर्वापर करण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
७२ तासांत तक्रारींवर कारवाई
अनधिकृत फलकांबाबत नागरिकांना १९१६ हेल्पलाईन, महापालिकेचे अधिकृत संकेतस्थळ आणि ‘myBMC’ अॅपवर तक्रार करता येणार आहे. प्राप्त तक्रारींवर कमाल ७२ तासांत कारवाई करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागातील कारवाई, वसूल झालेला दंड आणि दाखल गुन्ह्यांची माहिती असलेला साप्ताहिक अहवाल महापौरांना सादर केला जाणार आहे.
“श्रीगणेशोत्सवात शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य देऊन आपण पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून देतो. त्याचप्रमाणे वर्षभर प्लास्टिक आणि पीव्हीसी कचऱ्याचा विळखा रोखणे हेही आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून मुंबईच्या देखणेपणासाठी सर्वांनी एकत्र यावे, यासाठी मी स्वतः सर्व राजकीय पक्षांना पत्र देऊन पुढाकार घेणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मिळून मुंबईला फ्लेक्समुक्त करण्यासाठी प्रयत्न करतील,” असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.



