महाराष्ट्र

कर्तव्य बजावताना पोलिस चक्कर येऊन पडला, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मदतीला धावले..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तत्परतेने ताफ्यातील पोलिसाचा जीव वाचला

ताफ्यातील रुग्णवाहिकेत घालून स्वतः खाजगी रुग्णालयात केले दाखल

ठाणे :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील माणुसकी आणि संवेदनशीलतेचा आज पुन्हा एकदा प्रत्यय आला. त्यांनी दाखवलेल्या तत्परतेने कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचे प्राण वाचले आहेत.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी पोलिस सकाळपासूनच कर्तव्य बजावत असतात, मात्र या नोकरीचा त्यांच्यावर ताण आल्याशिवाय राहत नाही. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस निरीक्षक संजय नलावडे हे सकाळपासूनच उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कर्तव्य बजावत होते.

सकाळी ठाण्यातील टेंभी नाका येथील आई दुर्गेश्वरीचे मंडप पूजन करून उपमुख्यमंत्री शिंदे हे पुण्याला अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जाणार होते. त्यानुसार ठाण्यातील नियोजित कार्यक्रम आटोपून उपमुख्यमंत्री शिंदे हे साकेत हेलिपॅड वरून हेलिकॉप्टरद्वारे पुण्याला रवाना झाले. अवघ्या काही तासात नानांकडे जाऊन पुढील कार्यक्रमासाठी पुन्हा ठाण्यातील त्याच हेलिपॅडवर लँड होत असताना त्यांच्या ताफ्यात कर्तव्य बजावत असलेले संजय नलावडे हे अचानक चक्कर येऊन कोसळले.

आपल्या समोरच पोलीस कोसळल्याचे पाहताच क्षणाचाही विलंब न लावता शिंदे हेलिकॉप्टर मधून उतरून थेट त्यांच्याकडे धावत गेले. तोपर्यंत इतर सहकाऱ्यांनी त्यांना रुग्णवाहिकेत आणून ठेवले होते. शिंदे यांनी तत्काळ ही रुग्णवाहिका ज्युपिटर हॉस्पीटल मध्ये घेऊन जाण्यास सांगितले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी स्वतः ही रुग्णवाहिका पुढे ठेवत आपल्या ताफ्यातून ती ज्युपिटर रुग्णालयापर्यंत घेऊन गेले.

यानंतर त्यांनी नलावडे यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यास डॉक्टराना सांगितले. स्वतः उपमुख्यमंत्री पोलिसाला घेऊन रुग्णालयात घेऊन आल्याचे कळताच उपायुक्त प्रशांत कदम आणि वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट हेदेखील तत्काळ ज्युपिटर रुग्णालयात आले. तोपर्यंत नलावडे यांच्यावर डॉक्टरांनी पुढील उपचार सुरू केले होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नलावडे यांच्यावर लागतील ते सर्व उपचार करा आणि खर्चाची काळजी करू नका असेही रुग्णालय प्रशासनाला सांगितले.

दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे हे नंतर आपल्या पुढील नियोजित कार्यक्रमांसाठी मुंबईकडे रवाना झाले.तर नलावडे यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली पुढील उपचार सुरू आहेत. असे असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारंवार फोनवरून त्यांच्या प्रकृतीची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेत आहेत.

गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्यातील पोलीस निरीक्षक विजय सांगाडे यांचा हृदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यावेळीही त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. मात्र तरीही सांगाडे यांचा जीव वाचू शकला नाही.

मात्र आज पुन्हा एकदा स्वतःच्या डोळ्यापुढे पोलीस अधिकारी कोसळताना पाहताच, शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः पुढाकार घेऊन या पोलिसाचे प्राण वाचवले. असे असले तरी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाच्या आशीर्वादाने पोलिस निरीक्षक संजय नलावडे यांचे प्राण वाचले असून, आपण मात्र केवळ निमित्तमात्र होतो अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी या घटनेनंतर दिली आहे. मात्र त्यांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि तत्परता यामुळेच या पोलिसाचे प्राण वाचवता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे या निमित्ताने त्यांच्यातील संवेदनशील नेत्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.

Related Articles

Back to top button