Emotional Appeal! ‘उत्सवाचा खर्च वाचवून शेतकऱ्यांचे अश्रू पुसा’; शिंदेंचे जनतेला आवाहन.

प्रशांत गोडसे
मुंबई : यंदा पावसाने क्रूर दगा दिला. आभाळाने विश्वासघात केला. राज्यातील अनेक भागांत उभ्या पिकांनी माना टाकल्या आहे. हिरव्या शेतांमध्ये आता केवळ करपलेली स्वप्ने आणि कोरडी माती उरली आहे. बळीराजाच्या घरात चिंता दिसते.डोळ्यात अश्रू थबकले आहेत,मनात भीती घर करून बसली आहे. अन्नदाता आज स्वतःच भूकेच्या उंबरठ्यावर उभा आहे.
या हृदयद्रावक पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनिक आवाहन केले आहे. आगामी नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम धुमधडाक्यात नव्हे, तर अत्यंत साधेपणाने, संयमाने साजरे करा. वाचलेला प्रत्येक रुपया दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी अर्पण करा… असे त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे.
यंदा पावसाने दगा दिला, निसर्गाचा प्रकोप झाला. पिके करपली. अनेक ठिकाणी उभ्या पिकांनी माना टाकल्या. त्यामुळे राज्यातील हजारो शेतकरी हवालदिल झाले आहेत. आपला अन्नदाता बळीराजा दुष्काळाच्या भीषण परिस्थितीशी दोन हात करत असताना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं ही आपल्या सर्वांची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. मी नेहमी सांगत आलो आहे की, "या राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क आमच्या बळीराजाचा आहे!" आमचे महायुती सरकार आणि शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीने व खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. सरकार म्हणून आम्ही सर्वतोपरी मदत करत आहोतच, पण एक समाज म्हणूनही आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. शेतकरी चिंताक्रांत असताना आगामी काळातील धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सव धुमधडाक्यात साजरे करणे योग्य ठरणार नाही. म्हणूनच, नवरात्रोत्सव आणि पुढील काळातील अन्य उत्सव, समारंभ किंवा सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करूया. या सर्व कार्यक्रमांचा निधी दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी द्यावा, असे नम्र आवाहन मी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सामाजिक संस्थांना आणि राज्यातील जनतेला करतो. अन्नदाता संकटात असताना त्याच्यासोबत आपण सर्वजण खंबीरपणे उभे राहिलो तर या नैसर्गिक संकटावर आपण नक्कीच मात करू, असा मला विश्वास आहे. यंदाच्या उत्सवाचा खर्च वाचवून जर आपण शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसू शकलो आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकलो, तर तीच आदिशक्ती जगदंबेची खरी सेवा ठरेल!
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 1, 2026
“या राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क आमच्या बळीराजाचा आहे”
पोस्ट मध्ये उपमुख्यमंत्री शिंदे लिहितात महायुती सरकार आणि शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे, अढळपणे उभी आहे. शेतकरी चिंताक्रांत, अश्रू ढाळत असताना आम्ही उत्सव साजरे करत नाही, तर त्यांच्या वेदनेला समजून घेतो, त्यांच्या दुःखाला आपले दुःख मानतो. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना, सामाजिक संस्थांना आणि संपूर्ण जनतेला त्यांनी भावुक आवाहन केले आहे – यंदाचा उत्सव साधा ठेवा, वाचलेला निधी बळीराजाच्या रडत्या डोळ्यांसाठी वळवा.
आपला अन्नदाता संकटात असताना सर्वांनी त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहिले पाहिजे कारण की त्याच्या हातात आपली काळी आई म्हणजेच भूमिचे भविष्य आहे.या नैसर्गिक संकटावरती नक्कीच मात करू.
शिंदे यांनी भावनिक संदेश दिला – जर यंदाच्या उत्सवाचा खर्च वाचवून आपण शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसू शकलो, त्यांच्या करपलेल्या चेहऱ्यावर पुन्हा आनंदाचे हसू फुलवू शकलो… तर तीच आदिशक्ती जगदंबेची खरी सेवा ठरेल. उत्सवाच्या थाटापेक्षा अन्नदात्याच्या मदतीला प्राधान्य द्या. समाजानेही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दुष्काळाच्या या काळात… उत्सवाच्या दिव्यांपेक्षा बळीराजाच्या घरात उजेडाची गरज जास्त आहे.
पावसाने दगा दिला असेल, पण आपण एकमेकांना दगा देऊ नये.
आज जर आपण शेतकऱ्यांच्या थकलेल्या हातात हात घातला, त्याच्या अश्रूंना आपले अश्रू मानले… तर उद्याच्या उत्सवात खरा,पवित्र आनंद असेल.



