महाराष्ट्र

डोंबिवली रासरंग दांडिया उत्सव रद्द; निधी शेतकरी मदतीसाठी

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यंदाचा डोंबिवलीतील भव्य ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवासाठी होणारा खर्च संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

डोंबिवलीतील नवदुर्गा मित्र मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी डी. एन. सी. शाळेच्या मैदानात ‘रासरंग’ दांडिया उत्सवाचे भव्य आयोजन होत असते. डोंबिवली, कल्याण, ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ आणि परिसरातील हजारो नागरिक या उत्सवात सहभागी होतात. गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सव डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरला आहे.

यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. अनेक भागांत पावसाच्या अनियमिततेमुळे पिके उद्ध्वस्त झाली आहेत. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक हातचे गेल्याने अनेक शेतकरी कुटुंबांच्या उत्पन्नाचा आधारच गेला आहे. हे नुकसान केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत आहे. शेतकरी संकटात असताना मोठा उत्सव साजरा करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवासाठी जमा होणारा निधी थेट संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी वळविण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. अलीकडेच त्यांनी अकोला, बुलढाणा आणि परिसरातील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संकटग्रस्त कुटुंबांना मदत करताना मुलांचे शिक्षण, विवाह आणि इतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्येही हातभार लावण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या माध्यमातूनही शेतकरी कुटुंबांना मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नवदुर्गा मित्र मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोणत्या भागातील शेतकऱ्यांना कोणत्या स्वरूपात मदत अधिक परिणामकारक ठरेल, याबाबतचे नियोजन सध्या सुरू आहे. नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेऊन मदतीचे स्वरूप निश्चित केले जाईल आणि मदत थेट गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचेल, याची काळजी घेतली जाईल. याबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल, असे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले.

यंदा रासरंगचा भव्य जल्लोष होणार नसला तरी नवरात्रोत्सवाची परंपरा कायम राहील. साधेपणाने देवीची घटस्थापना, पूजा आणि आराधना केली जाईल. उत्सव दरवर्षी साजरे करता येतात; मात्र संकटाच्या काळात अन्नदात्याच्या पाठीशी उभे राहणे अधिक महत्त्वाचे आहे, अशी भावना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Back to top button