‘राजकीय मागण्यांत रस नाही; विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करू’ – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : “आम्हाला राजकीय मागण्यांमध्ये रस नाही. त्याचे जे व्हायचे असेल ते होईल. मात्र, विद्यार्थ्यांच्या मागण्यांमध्ये आम्हाला रस आहे. विद्यार्थ्यांची प्रत्येक न्याय्य मागणी राज्य सरकार पूर्ण करेल,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून होत असलेली मागणी आणि पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते.
एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेच्या कथित पेपरफुटीप्रकरणी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या प्रकरणातील कथित गैरप्रकारांवरून आमदार रोहित पवार यांनीही अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी एमपीएससीच्या अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक केली असून संबंधित भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याचे आयोगाने जाहीर केले आहे.
“ज्या परीक्षेच्या संदर्भात एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, तो गैरप्रकार त्यांच्या पदभार स्वीकारण्यापूर्वीचा आहे. त्यांनी कोणते काम केले, त्याचे मूल्यमापन काय आहे, याचा विचार न करता आणि चौकशी अथवा पुरावे नसताना केवळ राजकीय मागणी करणे योग्य नाही,” असे फडणवीस म्हणाले.
बहुपर्यायी पद्धतीच्या मागणीवर समितीचा विचार
एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीत बदल करण्याच्या मागणीवरही सरकार विचार करीत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती विविध घटकांशी चर्चा करीत आहे. परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर वस्तुनिष्ठ अर्थात बहुपर्यायी प्रश्नपद्धती लागू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
दळवी समितीच्या अहवालानुसार बहुपर्यायी पद्धतीऐवजी वर्णनात्मक पद्धतीकडे जाण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा बहुपर्यायी पद्धतीची मागणी होत असल्याने समिती त्यावर विचार करीत आहे. समितीने त्यासंदर्भात सकारात्मक शिफारस केल्यास सरकार त्याचा सकारात्मक विचार करेल, असे फडणवीस यांनी सांगितले.
पुढील परीक्षेत विक्रमी पदे
एमपीएससीच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या कमी असल्याच्या तक्रारींचीही सरकारने दखल घेतली आहे. “मंत्रिमंडळाच्या बैठकीत एमपीएससीसंदर्भात पाच विभागांचे सादरीकरण झाले. प्रत्येक बैठकीत उपलब्ध पदे, रिक्त पदे आणि एमपीएससीकडे पाठविण्यात आलेल्या पदांची माहिती नियमितपणे घेतली जात आहे. त्यामुळे पुढील परीक्षेत आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणारी पदे आणण्याचा निर्णय आम्ही केला आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एमपीएससी सुधारणा समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
रोहित पवारांची राजीनाम्याची मागणी
एमपीएससी पेपरफुटीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी कथित पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणी आंदोलनाची भूमिकाही त्यांनी जाहीर केली आहे.



