महाराष्ट्र

अनंत चतुर्दशी 2026 : मुंबई-पुण्यात गणपती विसर्जनाला सुरुवात; बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची गर्दी.

प्रशांत गोडसे

मुंबई : दहा दिवसांच्या भक्तिमय उत्सवानंतर आज अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला निरोप देण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यभरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या असून, ढोल-ताशांचा गजर, लेझीम, पारंपरिक वाद्ये आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमले आहे. बाप्पाला निरोप देताना अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात पुढील वर्षीच्या आगमनाची आस दिसून येत आहे.
मुंबईतील लालबाग, परळ, गणेश गल्ली आणि काळाचौकी परिसरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. विविध प्रसिद्ध गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटी आणि अन्य विसर्जनस्थळांच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत.

परळच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

परळ येथील नरेपार्कचा प्रसिद्ध ‘परळचा राजा’ विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला आहे. यंदा वारकऱ्याच्या रूपातील गणरायाची आकर्षक मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. विठ्ठलभक्तीची झलक असलेल्या या रूपाचे दर्शन घेण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाली आहे.

मंडपातून बाहेर पडल्यानंतर परळचा राजा लालबागच्या दिशेने रवाना झाला. मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी तसेच बाप्पाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने जमा झाले आहेत.

गणेश गल्लीच्या राजाची मिरवणूक सुरू

मुंबईतील प्रसिद्ध गणेश गल्लीच्या राजाची विसर्जन मिरवणुकीपूर्वीची आरती पार पडली. त्यानंतर गणरायाला निरोप देण्यासाठी मिरवणुकीला सुरुवात झाली. गणेश गल्ली परिसरात बाप्पाच्या स्वागतासाठी आणि मिरवणुकीच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या साकारण्यात आल्या आहेत.

परिसरातील विविध ठिकाणी कलाकारांनी विषयानुरूप रांगोळ्या काढल्या असून, या रांगोळ्यांनी मिरवणुकीच्या मार्गाची शोभा वाढवली आहे.

कागदाच्या लगद्यापासून साकारलेला राजा तेजुकायाचा

लालबागमधील ‘राजा तेजुकायाचा’च्या विसर्जन मिरवणुकीलाही सुरुवात झाली आहे. या मंडळाची मूर्ती यंदा कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आली आहे. आकर्षक सजावट आणि देखण्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.बाप्पाला निरोप देण्यासाठी लालबाग परिसरात भक्तांचा ओघ सुरू असून, मिरवणुकीदरम्यान गणरायाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला आहे.

गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी तयारी

मुंबईतील प्रमुख विसर्जनस्थळ असलेल्या गिरगाव चौपाटीवरही प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे. सार्वजनिक तसेच घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी येथे मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. त्यामुळे चौपाटी परिसरात सकाळपासूनच भाविकांची वर्दळ वाढली आहे.

मुंबईचा राजा, लालबागचा राजा, परळचा राजा, गणेश गल्लीचा राजा, राजा तेजुकायाचा, रंगारी बदक चाळ, काळाचौकीचा महागणपती आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या प्रमुख गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांकडे गणेशभक्तांचे लक्ष लागले आहे.

पुण्यातही विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ

पुण्यातही मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. मानाचा पहिला श्री कसबा गणपती विधिवत पूजेनंतर पालखीत विराजमान करण्यात आला. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात विसर्जन मिरवणूक सुरू झाली.

कसबा गणपतीच्या दर्शनासाठी तसेच मिरवणूक पाहण्यासाठी मध्यवर्ती पुण्यात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि भक्तांच्या जयघोषामुळे पुण्यातील वातावरणही गणेशमय झाले आहे.

मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देत आहेत. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणरायाला निरोप दिला जात आहे

Related Articles

Back to top button