Accident News : समृद्धी महामार्गावर काळाचा घाला! ट्रक-बुलेरोची भीषण धडक; 7 जणांचा मृत्यू

अमरावती : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्तीच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच अमरावती जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. धामणगाव रेल्वे जवळ समृद्धी महामार्गावर ट्रक आणि बुलेरो टेम्पो-पिकअपची भीषण धडक झाली. या अपघातात प्राथमिक माहितीनुसार 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 21 जण गंभीर जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक 97 जवळ हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शेगाव येथून दुर्गा देवीची मूर्ती घेऊन एक वाहन वर्ध्याच्या दिशेने निघाले होते. धामणगाव रेल्वे परिसरातील समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक 97 जवळ या वाहनाची ट्रकसोबत जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की, वाहनातील 7 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी वर्धा येथील वैद्यकीय महाविद्यालयात तसेच सावंगी रुग्णालयात रेफर करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू आहेत.
सावंगी रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 19 जण गंभीर जखमी असून त्यापैकी तीन जणांची प्रकृती अधिक गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान, ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम आणि धामणगावच्या नगराध्यक्ष अर्चना रोठे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. मृत आणि जखमी हे वर्धा शहरातील सोमनाथे लेआउट आणि रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीची मूर्ती घेऊन जात असताना झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास पोलिसांकडून सुरू आहे.



