Umesh Kamat Priya Bapat Anniversary : उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या लग्नाला 15 वर्षे पूर्ण; खास पोस्टमधून व्यक्त केल्या मनातील भावना

मुंबई :मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांच्या लग्नाला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. 6 ऑक्टोबर रोजी या दोघांनी आपल्या लग्नाचा १५ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवसानिमित्त उमेश आणि प्रियाने सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे काही खास फोटो शेअर करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.उमेश कामत आणि प्रिया बापट यांची पहिली भेट 2002 मध्ये ‘भेट’ या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान झाली होती. त्यानंतर ‘आभाळमाया’ मालिकेच्या सेटवर दोघांची मैत्री झाली. कालांतराने या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. जवळपास आठ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर उमेश आणि प्रियाने 2011 मध्ये दसऱ्याच्या दिवशी लग्नगाठ बांधली.
लग्नाच्या 15 व्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त उमेश आणि प्रियाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून त्यांनी गेल्या 15 वर्षांच्या सहजीवनातील अनुभव, आठवणी आणि एकमेकांना दिलेली साथ याबद्दल भावना व्यक्त केल्या.
“आपल्याला लग्नाच्या 15 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! या 15 वर्षांनी आपल्याला खूप काही शिकवलं आहे. आपण प्रगती केली, नवीन गोष्टी शिकलो, काही वेळा अडखळलो, मनसोक्त हसलो आणि काळाच्या प्रत्येक कसोटीवर एकमेकांची साथ घट्ट धरून ठेवली,” अशा भावना त्यांनी पोस्टमधून व्यक्त केल्या.पुढे त्यांनी लिहिलं, “असेच एकमेकांचे विश्वासू सोबती, मित्र, सहकारी, सह-निर्माते, प्रवासातील जोडीदार… आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पती-पत्नी म्हणून सोबत राहूया. 15 वर्षे झाली आणि तरीही आपण एकमेकांचीच निवड करत आहोत.”
चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी अनेक चित्रपट, नाटकं आणि वेब सीरिजमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच ऑफस्क्रीन बॉन्डिंगलाही चाहत्यांची विशेष पसंती मिळते. गेल्या 15 वर्षांपासून एकमेकांची साथ देणाऱ्या या लोकप्रिय जोडीवर त्यांच्या चाहत्यांकडून आणि मनोरंजनसृष्टीतील कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



