मनोरंजन

Mukta Barve Meera Welankar : मुक्ता बर्वे आणि मीरा वेलणकर 25 वर्षांच्या मैत्रीनंतर पहिल्यांदाच निर्मात्या म्हणून एकत्र; ‘पुन्हा नक्की भेटू’ नाटकाची चर्चा

पंकज राणे

मुंबई : काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती सर्जनशीलतेच्या नव्या वाटा खुल्या करतात. अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि मीरा वेलणकर यांच्या 25 वर्षांच्या मैत्रीचा असाच एक नवा अध्याय रंगभूमीवर सुरू होत आहे. अनेक वर्षे अभिनेत्री म्हणून एकत्र काम केल्यानंतर या दोघी आता ‘पुन्हा नक्की भेटू’ या नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच निर्मात्या म्हणून एकत्र आल्या आहेत. मैत्री, विश्वास आणि कलात्मक दृष्टिकोन यांची सांगड घालणाऱ्या या नाटकात मुक्ता बर्वेसोबत प्रियदर्शन जाधव, अंशुमन विचारे आणि आरती वडगबाळकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. मुक्ता बर्वे, मीरा वेलणकर आणि दिलीप जाधव हे या नाटकाचे निर्माते आहेत. ‘रंगमाया’ आणि ‘अष्टविनायक’ या संस्थांच्या माध्यमातून या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. या नाटकामुळे मुक्ता आणि मीरा यांच्या मैत्रीला व्यावसायिक सहकार्याची नवी जोड मिळाली आहे.

भावाच्या लेखणीत सापडली नाटकाची संहिता

‘पुन्हा नक्की भेटू’ या नाटकाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्याची संहिता मुक्ताला बाहेर कुठे नव्हे, तर स्वतःच्या घरातच सापडली. कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या तिच्या भावाने, देबू बर्वे यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. मीरा वेलणकर यांनी नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे.अभिनय, दिग्दर्शन आणि जाहिरात क्षेत्रातील अनुभव असलेल्या मीरा वेलणकर यांचं नाट्यनिर्मितीच्या क्षेत्रातील हे पहिलंच पाऊल आहे. या निमित्ताने ‘रंगमाया’ या नव्या नाट्यसंस्थेचीही सुरुवात होत आहे. त्यामुळे हे नाटक मुक्ता आणि मीरा या दोघींसाठीही विशेष महत्त्वाचं ठरणार आहे.

‘मीराची कलात्मक दृष्टी खूप वेगळी’ – मुक्ता बर्वे

या नव्या सहप्रवासाबद्दल बोलताना मुक्ता बर्वेने मीरा वेलणकरसोबत काम करण्याचा अनुभव व्यक्त केला. ती म्हणाली, “मैत्रीण म्हणून मीरा खूप छान आहेच. पण दिग्दर्शिका म्हणून तिच्यासोबत काम करणं हा माझ्यासाठी समृद्ध करणारा आणि खूप काही शिकवणारा अनुभव आहे. नाटक हाताळताना तिच्यातील कलात्मक दृष्टी आणि संवेदनशीलता प्रकर्षाने जाणवते. या नाटकाच्या तालमीदरम्यान मला मिळालेला फीडबॅकही माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. ‘या नाटकात तुम्ही खूप वेगळ्या दिसता’, अशी प्रतिक्रिया मला मिळाली.”पुढे ती म्हणाली, “कलाकारामधले वेगळे पैलू ओळखून ते प्रेक्षकांसमोर आणणारा दिग्दर्शक मिळणं महत्त्वाचं असतं. मीराच्या रूपाने मला ती साथ मिळाली आहे. माझी बलस्थानं ओळखून, माझ्यातील सर्वोत्तम गोष्टी बाहेर काढण्याची ताकद तिच्यात आहे. तिची कलात्मक दृष्टी आणि विचार करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. तिच्या या वेगळेपणाचा प्रत्यय ‘पुन्हा नक्की भेटू’ या नाटकातून प्रेक्षकांना नक्कीच येईल, असा मला विश्वास आहे.”

‘एकमेकांवरील विश्वासामुळे नाटक करताना खूप मजा आली’ – मीरा वेलणकर

या नाटकाच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाबद्दल मीरा वेलणकरनेही आपले विचार मांडले. ती म्हणाली, “कोणतंही काम सुंदर होण्यासाठी एकमेकांवरचा विश्वास आणि परस्परांची साथ खूप महत्त्वाची असते. मुक्ता आणि दिलीप जाधव यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी खास आहे. मुक्ता आणि मी याआधी एकत्र काम केलं असलं, तरी यावेळी निर्माते म्हणून एकत्र येणं हा वेगळाच अनुभव आहे. आमच्यातला छान समन्वय आणि एकमेकांना दिलेली साथ यामुळे नाटक करताना खूप मजा आली. हाच आनंद प्रेक्षकांपर्यंतही पोहोचेल, असा मला विश्वास आहे.”

‘पुन्हा नक्की भेटू’चे शुभारंभाचे प्रयोग कधी आणि कुठे?

या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग ऑक्टोबरमध्ये मुंबई, ठाणे आणि वाशी येथे होणार आहेत. त्यानंतर नोव्हेंबरमध्येही विविध नाट्यगृहांमध्ये प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.

शुक्रवार, 23 ऑक्टोबर: दुपारी 4 वाजता – दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले

शनिवार, 24 ऑक्टोबर: रात्री 8:30 वाजता – गडकरी रंगायतन, ठाणे

रविवार, 25 ऑक्टोबर: दुपारी 4 वाजता – विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी

रविवार, 8 नोव्हेंबर: दुपारी 3:30 वाजता – प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली

मंगळवार, 10 नोव्हेंबर: रात्री 8:30 वाजता – रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी

बुधवार, 11 नोव्हेंबर: दुपारी 4 वाजता – आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण

शुक्रवार, 13 नोव्हेंबर: दुपारी 4:30 वाजता – कालिदास नाट्य मंदिर, मुलुंड

25 वर्षांच्या मैत्रीचा विश्वास आणि रंगभूमीवरील नव्या प्रयोगांची उत्सुकता घेऊन मुक्ता बर्वे आणि मीरा वेलणकर यांचं ‘पुन्हा नक्की भेटू’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता या दोघींच्या नव्या सर्जनशील सहप्रवासाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Back to top button