मनोरंजन

Madhu Kambikar Death : ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर यांचं निधन; वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पंकज राणे

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर यांचं निधन झालं आहे. त्या ७३ वर्षांच्या होत्या. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीसह लोककलेच्या क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

तमाशाच्या फडातून सुरू झाला अभिनयाचा प्रवास

मधु कांबीकर यांचा जन्म 28 जुलै 1953 रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे झाला. तमाशाच्या फडातून त्यांच्या कलाप्रवासाला सुरुवात झाली. आपल्या अभिनय आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर त्यांनी लोककलेच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पुढे त्यांनी रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवत चित्रपट, लोकनाट्य, व्यावसायिक रंगभूमी आणि दूरदर्शन मालिकांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली.

‘शापित’ चित्रपटातून अभिनयाची विशेष दखल

ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या ‘शापित’ या चित्रपटातून मधु कांबीकर यांच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली. त्यानंतर त्यांनी विविध चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘हेच माझं माहेर’, ‘राघुमैना’, ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’, ‘डेबू’ आणि ‘येऊ का घरात’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या.लावणी आणि तमाशा या लोककलांशी घट्ट नातं जोडलेल्या मधु कांबीकर यांनी आपल्या कलाविष्कारातून मराठी मनोरंजनविश्व समृद्ध केलं. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीने एक ज्येष्ठ अभिनेत्री, तर लोककलेच्या क्षेत्राने एक महत्त्वाची कलावंत गमावली आहे.

Related Articles

Back to top button