Gauri Ingawale New Marathi Movie Dashmi : ‘दशमी’मध्ये गौरी इंगवलेचा दुर्गा अवतार; ‘चंडिका हो’ गाण्याची चर्चा, चित्रपट 23 ऑक्टोबरला प्रदर्शित

पंकज राणे
मुंबई : रावणाचा अंत झाला, महिषासुराचा संहार झाला; पण आजच्या काळातील अन्याय आणि अधर्माविरोधात कोण उभं राहणार? या प्रश्नाला भिडणारा ‘दशमी’ हा मराठी चित्रपट येत्या २३ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजयादशमीच्या पारंपरिक संकल्पनेला आजच्या सामाजिक वास्तवाची जोड देणाऱ्या या चित्रपटात अभिनेत्री गौरी इंगवले हिचा दुर्गा अवतार लक्ष वेधून घेत आहे. चित्रपटातील ‘चंडिका हो’ या गाण्यातून स्त्रीशक्ती आणि अन्यायाविरोधातील संघर्षाचा प्रभावी आविष्कार पाहायला मिळणार आहे.

‘चंडिका हो’ गाण्यात गौरी इंगवलेचा रौद्र अवतार
‘चंडिका हो’ या गाण्यात गौरी इंगवले एका वेगळ्याच रूपात दिसत आहे. अंगावर लाल वस्त्र, कपाळावर कुंकवाचा मळवट, गळ्यात कवड्यांची माळ, तीक्ष्ण नजर आणि हातात अन्यायाविरोधात लढण्याचा निर्धार व्यक्त करणारी ज्योत, अशा प्रभावी रूपात तिचं व्यक्तिमत्त्व साकारण्यात आलं आहे. तिचा रौद्र आणि सामर्थ्यशाली अंदाज या गाण्याचं खास आकर्षण ठरत आहे.सुरेश पंडित यांनी या गाण्याचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं असून, गायक जसराज जोशी यांनी आपल्या आवाजाने गाण्याला स्वर दिला आहे. स्त्रीशक्ती, अन्यायाविरोधातील लढा आणि आदिशक्तीचा जागर यांचा संगम या गाण्यातून अनुभवायला मिळणार आहे.

दुर्गा म्हणजे अन्यायाविरोधात उभी राहणारी शक्ती!
दुर्गेचं रूप केवळ पूजनीय शक्तीपुरतं मर्यादित नसून, अन्याय आणि अधर्माविरोधात उभं राहण्याचं ते प्रतीक आहे, हा विचार ‘चंडिका हो’ या गाण्यातून अधोरेखित करण्यात आला आहे. गौरी इंगवलेचा रौद्र, गूढ आणि प्रभावी अंदाज चित्रपटाच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण करतो. आजच्या समाजात अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची गरज आणि त्यासाठी आवश्यक असलेली ताकद यांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. त्यामुळे ‘दशमी’च्या कथेत पौराणिक प्रतीकांना समकालीन सामाजिक संदर्भांची जोड मिळणार आहे.
मकरंद अनासपुरे, महेश मांजरेकरांसह दिग्गज कलाकारांची फळी
‘दशमी’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केलं आहे. चित्रपटात गौरी इंगवलेसोबत मकरंद अनासपुरे, विजय निकम, महेश मांजरेकर, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकवाड, शाम माशाळकर आणि राज कुंदन हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. तसेच दाक्षिणात्य अभिनेते रवि प्रकाश यांचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित होणारा हा चित्रपट ‘वाईटावर चांगल्याचा विजय’ या पारंपरिक विचाराला आजच्या सामाजिक परिस्थितीशी जोडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ‘दशमी’मधून केवळ थरारक कथानकच नव्हे, तर अन्यायाविरोधात उभं राहण्याचा आणि स्त्रीशक्तीचं सामर्थ्य अधोरेखित करण्याचा संदेशही दिला जाणार आहे.‘दशमी’ हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून, गौरी इंगवलेचा दुर्गा अवतार आणि ‘चंडिका हो’ हे गाणं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.



