बाप्पाच्या निरोपासाठी मेट्रो-३ची ‘रात्र’सेवा

अनंत चतुर्दशीला अँक्वा लाइन’चा भाविकांना दिलासा
मुंबई : गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी घराबाहेर पडणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रो-३ अर्थात ‘अँक्वा लाइन’ची सेवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्रभर सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकांमुळे होणारी वाहतूककोंडी, मार्गबदल आणि संथ वाहतुकीचा सामना न करता मुंबईकरांना रात्री उशिरापर्यंत सुरक्षित आणि जलद प्रवास करता येणार आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी दक्षिण मुंबईसह शहरातील प्रमुख रस्त्यांवर गणेश विसर्जन मिरवणुकांमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अनेक मार्गांवरील वाहतूक वळवण्यात येते, तर काही मार्गांवर वाहतूक संथ गतीने सुरू असते. या पार्श्वभूमीवर मेट्रो-३ची रात्रभर सेवा भाविकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
आरे ते कफ परेडदरम्यान धावणाऱ्या मेट्रो-३मुळे रस्त्यावरील गर्दी टाळून भाविकांना आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचणे शक्य होणार आहे. विशेषतः दक्षिण मुंबईतील विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या तसेच रात्री उशिरा घरी परतणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
लोकल सेवा रात्री उशिरापर्यंत
मध्य रेल्वे,हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरही भाविकांच्या सोयीसाठी रात्री उशिरापर्यंत लोकलसेवा सुरू राहणार आहे.यामुळे भाविकांना गणरायाच्या निरोपानंतर आपल्या घरी जाण्यासाठी सुविधा निर्माण झाली आहे.
दक्षिण मुंबईत गिरगाव चौपाटी येथे भाविक विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात त्यांना या लोकल सेवांचा आणि अँक्वा मेट्रोचा लाभ होणार आहे.
विसर्जनाच्या दिवशी वाहतूककोंडी टाळण्यासाठी भाविकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, तसेच प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



