मुंबई

Political Controversy : सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने मुंब्र्यात राजकीय वाद पेटला! नितेश राणेंची पाकिस्तानात पाठवण्याची मागणी

प्रशांत गोडसे

मुंबई : ‘कैसा हराया?’ या वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. औरंगजेबाचे कौतुक करणारी आणि ताजमहाल, हुमायूनची कबर यांसारख्या मुघलकालीन वास्तूंचा गौरव करणारी सोशल मीडिया पोस्ट त्यांनी शेअर केली. या पोस्टमधून औरंगजेबाचे उदात्तीकरण होत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. या प्रकरणावरून भाजप आमदार नितेश राणे यांनीही आक्रमक भूमिका घेत सहर शेख यांना पाकिस्तानात पाठवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोस्टच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाने मुंब्र्यात आंदोलन देखील केले.

सहर शेख यांनी इन्स्टाग्रामवर औरंगजेबाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली होती. ‘इतिहास कधीही पुसता येत नाही’, असा संदेश देत त्यांनी औरंगजेबाच्या कारकिर्दीचा उल्लेख केला. याशिवाय ताजमहाल आणि हुमायूनची कबर यांसारख्या मुगलकालीन वास्तूंची छायाचित्रेही पोस्ट केली. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल मुगलांनी बांधल्याचा संदर्भ देत त्यांनी या वास्तूंचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले . इतिहासाच्या पुस्तकांतून मुघलांचा उल्लेख कमी करता येईल; मात्र त्यांनी उभारलेल्या वास्तूंच्या माध्यमातून इतिहास कसा पुसणार, असा सवालही या पोस्टमधून उपस्थित करण्यात आला होता.

या पोस्टनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या. भाजप आमदार नितेश राणे यांनी सहर शेख यांच्यावर टीका करत, मुघल आणि औरंगजेबाबद्दल एवढेच प्रेम असेल, तर त्यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे, अशी मागणी केली. त्यांच्या या विधानामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले.

मुंब्र्यात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

सहर शेख यांच्या पोस्टच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष समर्थ नायक यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंब्र्यात आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी औरंगजेबाच्या उदात्तीकरणावर आक्षेप घेत निषेध व्यक्त केला. ‘मुगलांची एवढीच आठवण येत असेल, तर पाकिस्तानात निघून जा. हे हिंदू राष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना गाडून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळे हा कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही, हे लक्षात ठेवावे,’ अशा शब्दांत आंदोलकांनी सहर शेख यांच्यावर टीका केली.

दरम्यान, यापूर्वी ‘मुंब्रा हिरवा करून टाकू’ आणि ‘कैसा हराया?’ या विधानांमुळेही सहर शेख चर्चेत आल्या होत्या. आता औरंगजेब आणि मुगलकालीन वास्तूंबाबतच्या पोस्टमुळे त्यांच्याभोवती पुन्हा राजकीय वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरील पोस्टपासून सुरू झालेला हा वाद आता भाजपच्या आंदोलनापर्यंत पोहोचला असून, यावर सहर शेख काय प्रतिक्रिया देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button