मुंबई

पुनर्विकास प्रकल्पातील जुन्या घरमालकाची घाटकोपरमधील नामांकित बिल्डरविरोधात पोलीस तक्रार; कुलूप तोडून घरात तोडफोड केल्याचा आरोप!

मुंबई: घाटकोपर पूर्वेकडील गरोडिया नगर परिसरातील नीलकंठ टॉवर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या पुनर्विकासावरून मोठा वाद समोर आला आहे. सोसायटीतील रहिवासी अनिताबेन अशोक भाटिया (वय ७०) यांनी आपल्या परस्पर घरात घुसून फर्निचर, खिडक्या आणि वीज जोडणीची तोडफोड केल्याप्रकरणी नामांकित विकासकाविरोधात (बिल्डर) आपला मुलगा मनीष भाटिया यांच्यामार्फत पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अनिताबेन भाटिया या गेल्या ४२ वर्षांहून अधिक काळापासून नीलकंठ टॉवर सोसायटीच्या नीलकंठ ॲनेक्समधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ए-२ मध्ये आपल्या कुटुंबासह राहत आहेत. त्यांच्या माहितीनुसार, ही इमारत पुनर्विकासासाठी गेली असून सोसायटीत एकूण ७२ फ्लॅट्स आहेत. बहुतांश रहिवाशांनी घरे रिकामी करून विकासकाच्या ताब्यात दिली आहेत. मात्र, बिल्डरने तयार केलेल्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये त्यांच्या घराचे क्षेत्रफळ ६०५ चौरस फुटांऐवजी ४४८ चौरस फूट दाखवण्यात आल्यामुळे हा वाद सुरू झाला.

नवीन डीएची मागणी आणि घराची चावी न देण्याचा वाद
तक्रारदार कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, त्यांना सप्लिमेंटरी डीए मान्य नसून मूळ क्षेत्रफळानुसार नवीन करार हवा आहे. बिल्डरकडून ही मागणी मान्य होत नसल्याने त्यांनी घराची चावी दिली नव्हती. बहुतांश घरे रिकामी झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव कुटुंब तात्पुरते पंतनगर येथे भाड्याच्या घरात राहायला गेले होते; मात्र फ्लॅटचा ताबा अधिकृतपणे बिल्डरला सोपवला नव्हता.

मनीष भाटिया यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ते नीलकंठ टॉवरमधील आपल्या फ्लॅटवर गेले असता, घराचे कुलूप तोडलेले दिसले. घरात प्रवेश केला असता आतील खिडक्यांची ग्रील, घरातील विजेचे कनेक्शन आणि बाथरूममधील वॉशबेसिनची जाणीवपूर्वक तोडफोड केल्याचे उघडकीस आले. आम्ही पुन्हा येथे राहायला येऊ नये, म्हणूनच बिल्डरकडून हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पोलिसांची भूमिका आणि विकासकाचा खुलासा
पंतनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता दत्तात्रेय सुतार यांनी स्पष्ट केले की, मनीष भाटिया यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला असून त्यानुसार गुन्हा नोंदवण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या बाजूला, विकासक सिल्व्हर ग्रुपचे कमलेश शाह यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आम्ही सप्लिमेंटरी डीए करण्यास पूर्णपणे तयार आहोत; मात्र संबंधित कुटुंब वेगवेगळ्या अवाजवी मागण्या करत आहे. कायद्यानुसार जे देय आहे, ते सर्व देण्यास आमची तयारी आहे.” या प्रकरणी पंतनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Back to top button