Prison Security : महाराष्ट्रातील कारागृहे होणार हायटेक; सुरक्षेसाठी २३.३७ कोटींचा निधी मंजूर…
मुंबई : राज्यातील कारागृहांमधील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी गृह विभागाने २३ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या रकमेतून ३८९ हायमास्ट पोल आणि ३७ बॅगेज स्कॅनरच्या खरेदीचा खर्च भागवला जाणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय बुधवारी जारी करण्यात आला.
कारागृहांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील अंधाऱ्या जागा आणि प्रवेशाच्या ठिकाणी होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे असते. त्यासाठी राज्यातील विविध कारागृहांमध्ये हायमास्ट दिवे बसवले जाणार आहेत. या दिव्यांमुळे रात्रीच्या वेळी तुरुंग परिसरात अधिक प्रकाश राहील. तसेच कैद्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी बॅगेज स्कॅनरचा वापर केला जाणार आहे.
३८९ हायमास्ट पोल, ३७ स्कॅनरचा समावेश
या सुरक्षा योजनेत ३८९ हायमास्ट पोल आणि ३७ बॅगेज स्कॅनरचा समावेश आहे. हायमास्ट दिव्यांमुळे कारागृहाच्या आवारातील हालचालींवर नजर ठेवणे सोपे होईल. तर स्कॅनरमुळे बाहेरून आणल्या जाणाऱ्या सामानाची तपासणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. त्यामुळे कारागृहात प्रतिबंधित वस्तू नेण्याचे प्रकार रोखण्यास मदत होणार आहे.
विशेष म्हणजे, ही उपकरणे खरेदी करून संबंधित कारागृहांपर्यंत पोहोचवण्यात आली आहेत. आता त्यांच्या खरेदीची प्रलंबित बिले चुकती करण्यासाठी सरकारने निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. ही रक्कम कारागृह व सुधारसेवा महासंचालक, पुणे यांच्याकडे वर्ग करण्यात येणार आहे.
अर्थसंकल्पातून १० कोटी, पूरक मागणीतून १३.३७ कोटी
या कामासाठी एकूण २३ कोटी ३७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी १० कोटी रुपये मूळ अर्थसंकल्पातून, तर १३ कोटी ३७ लाख रुपये पूरक मागणीतून उपलब्ध झाले आहेत. मंजूर निधीचा वापर केवळ हायमास्ट पोल आणि बॅगेज स्कॅनरच्या खरेदीच्या देयकांसाठीच करावा, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. अन्य कोणत्याही कामासाठी ही रक्कम वापरता येणार नाही.
या उपकरणांमुळे कारागृहांच्या सुरक्षेत सुधारणा होण्यास मदत होणार आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी परिसरावर लक्ष ठेवणे आणि भेटीसाठी येणाऱ्या व्यक्तींच्या सामानाची तपासणी करणे अधिक सोयीचे होईल. त्यामुळे तुरुंगांमधील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.



