Kon Honaar Crorepati : नऊवारीतील माधुरीचा मराठमोळा अंदाज; रवीना आणि सोनालीसोबत रंगणार ‘करोडपती’चा मंच!

Kon Honaar Crorepati Diwali Special Show : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर यंदा दिवाळीचा खास जल्लोष पाहायला मिळणार आहे. या दिवाळी विशेष भागात बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका माधुरी दीक्षित यांच्यासोबत या दोघींच्या गप्पा, धमाल आणि दिवाळीच्या आठवणींची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या विशेष भागाचा प्रोमो समोर आला असून, त्यातील माधुरीचा मराठमोळा अंदाज विशेष लक्ष वेधून घेत आहे.
दिवाळी विशेष भागासाठी माधुरी दीक्षितने गुलाबी रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली आहे. केसांमध्ये गुलाबाचे फूल, नाकात नथ आणि गळ्यात आकर्षक नेकलेस अशा पारंपरिक दागिन्यांनी तिचा लूक अधिक खुलला आहे. या मराठमोळ्या रूपात माधुरीने मंचावर एन्ट्री घेतली. यावेळी माधुरी आणि सोनाली कुलकर्णी यांनी एकत्र फुगडी खेळत दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. त्यांच्या गप्पांमधून सणाच्या जुन्या आठवणींनाही उजाळा मिळाला.
माधुरीने सांगितला अमेरिकेतील दिवाळीचा किस्सा
गप्पांच्या ओघात माधुरीने अमेरिकेत दिवाळी साजरी करतानाचा एक मजेशीर किस्सा सांगितला. सोनालीशी बोलताना ती म्हणाली की, डेन्व्हरमध्ये राहत असताना ती मुलांसाठी फटाके आणायची. मात्र, तिथले फटाके भारतातील फटाक्यांसारखे नसल्याचे तिने गंमतीने सांगितले. एक लडी लावली की काही वेळ पिक-पिक असा आवाज व्हायचा आणि लगेच ती संपायची, असे माधुरीने सांगितले.
यावर सोनाली कुलकर्णीनेही मिश्किल उत्तर दिले. “अरे, आमचे लक्ष्मीबॉम्ब तुझ्या फोटोंनी सजलेले होते,” असे सोनाली म्हणाली. तिचे हे उत्तर ऐकताच माधुरी आणि सोनाली दोघीही खळखळून हसू लागल्या. या संवादामुळे कार्यक्रमातील हास्यविनोदाची झलक पाहायला मिळाली.
रवीनाच्या घरी दिवाळीत बनतात खास गोड पदार्थ
यानंतर माधुरीने रवीना टंडनला तिच्या घरातील दिवाळीच्या तयारीबद्दल विचारले. दिवाळीत तिच्या घरी कोणकोणते गोड पदार्थ बनवले जातात, असा प्रश्न माधुरीने विचारला. त्यावर रवीनाने सांगितले की, त्यांच्या घरी दिवाळीनिमित्त विविध प्रकारचे गोड पदार्थ बनवले जातात. लहानपणी गोड पदार्थ खाण्याची रवीनाला खूप आवड होती. तिच्या या आवडीवरून तिचे बाबा गंमतीने तिचे लग्न एखाद्या हलवाईसोबत लावून देतील, असे म्हणायचे. रवीनाने सांगितलेल्या या आठवणींमुळे दिवाळीच्या गप्पांना आणखी रंगत आली.माधुरीचा नऊवारीतील पारंपरिक लूक, सोनालीसोबतची फुगडी, रवीनाच्या बालपणीच्या आठवणी आणि तिघींमधील धमाल यामुळे ‘कोण होणार करोडपती’चा हा दिवाळी विशेष भाग मनोरंजक ठरणार आहे. त्यामुळे या खास भागात आणखी कोणते किस्से आणि धमाल पाहायला मिळणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.



