मनोरंजन

Abir Marathi Movie New Song : ‘अबीर’मधील ‘गुडघ्याला बाशिंग बांधलं…’ गाणे प्रदर्शित; 18 डिसेंबरला चित्रपटगृहांत रंगणार मनोरंजनाची मैफल

मराठी चित्रपटसृष्टीत ग्रामीण जीवन, नात्यांमधील भावबंध, सामाजिक वास्तव आणि मनोरंजन यांची सांगड घालणारा ‘अबीर’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्यातील ‘गुडघ्याला बाशिंग बांधलं…’ हे लावणीप्रधान गाणे प्रदर्शित झाले असून, या गाण्यातून गावातील कार्यक्रमाची लगबग, लावणीचा ठसका आणि उत्सवी वातावरण अनुभवायला मिळत आहे. ‘अबीर’ हा चित्रपट येत्या 18 डिसेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

‘गुडघ्याला बाशिंग बांधलं…’ या गाण्यात ‘जाते जिथं जिथं बाई…’ असे बोल असून, गावातील एका कार्यक्रमात आमदारांचे आगमन आणि त्यानंतर रंगणारी लावणीची मैफल दाखवण्यात आली आहे. नृत्यांगना मानसी शिंदे हिच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात तिचा नृत्याविष्कार, अदाकारी आणि लावणीचा पारंपरिक ठसका पाहायला मिळतो. वैभव देशमुख यांनी गाण्याची शब्दरचना केली असून, रोहित नागभिडे यांच्या संगीताला राधा खुडे यांच्या दमदार आवाजाची साथ लाभली आहे. सुजित कुमार यांनी गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.

सुदेश वसंतराव झावरे पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, शंभो एंटरटेनमेंट आणि श्री महाकाल प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. आकाश विष्णू शिंदे यांनी चित्रपटाचे पटकथा लेखन, संवादलेखन आणि दिग्दर्शन केले आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या कथेत मनोरंजनासोबतच भावनिक आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार आहेत.चित्रपटात पायल जाधव, निखिल चव्हाण, देविका दफ्तरदार, अविनाश नारकर, गणेश देशमुख, प्राजक्ता हनमघर, गार्गी फुले, यश डिंबळे, रोशन सुनील राऊत, प्रशांत नेटके, गायत्री सुदेश झावरे, रेखा दहातोंडे, राजवर्धन झावरे आणि साईराज केंद्रे यांच्या भूमिका आहेत. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील हेही विशेष भूमिकेत दिसणार आहेत.

चित्रपटाचे छायांकन निशांत भागवत यांनी केले असून, संकलनाची जबाबदारी निलेश गावंड यांनी सांभाळली आहे. रोहित नागभिडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. आर्या आंबेकर, वैशाली माडे आणि राधा खुडे यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. अनुभवी कलाकार आणि तंत्रज्ञांच्या सहभागामुळे ‘अबीर’च्या प्रदर्शनाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. आता 18 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांचे कितपत मनोरंजन करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Back to top button